आमदार रामनाथ मोते यांचे प्राथमिक शिक्षकांना आश्वासन

ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनेक पदवीधर शिक्षकांनी नियमबाह्य़ वेतनश्रेणी लागू करून घेतली आहे, असा ठपका ठेवत, ती त्यांच्या वेतनातून वसूल करण्याचा फतवा प्रशासनाने काढला असला तरी अशा प्रकारची कोणतीही वसुली पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या वेतनातून करू दिली जाणार नाही, असे आश्वासन कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी नुकतेच येथे दिले.

ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद शहापूर शाखेचा मेळावा कुणबी भवन येथे आयोजित करण्यात आला होता. शिक्षकांची अशैक्षणिक कामातून पूर्ण मुक्तता होईपर्यंत आपण शासनाकडे लढा देत राहणार आहोत. शिक्षकांच्या वैद्यकीय उपचारासाठी रोख रक्कम मुक्त आरोग्य योजना राबविण्यात येणार आहे. पदवीधर शिक्षकांना त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे मिळालेली श्रेणी त्यांच्या वेतनातून कापली जाणार नाही. आदिवासी दुर्गम भागातील वीस पटाच्या शाळा चालू ठेवण्यासाठी शासनाला भाग पाडण्यात येणार आहे. शिक्षकांनी शाळा बंद पडणार नाही, यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आमदार मोते म्हणाले.