News Flash

शहरबात, वसई : तात्पुरता दिलासा!

३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षांचे स्वागत करून घरी परतलेल्या वसईकरांना मोठा धक्का बसला.

ST bus employees strike in Mumbai and Panvel : सर्वप्रथम आज सकाळी मुंबई सेंट्रल आणि परळ आगारातील कर्मचाऱ्यांनी चक्का जाम करत वाहतूक रोखून धरली. त्यामुळे तब्बल दोन ते तीन तास या आगारांमधून एकही एसटी सोडली गेली नाही.

एक जानेवारी रोजी वसई-विरारमधून एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, तो नंतर मागे घेण्यात आला असला तरी हा वसईकरांना तात्पुरता दिलासा आहे. कारण मार्चनंतर वसईमधून एसटी हद्दपार होणारच आहे. मात्र पर्यायी व्यवस्था द्यायला पालिका तूर्तास तयार नाही.

३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षांचे स्वागत करून घरी परतलेल्या वसईकरांना मोठा धक्का बसला. त्यांच्या दारात येणारे हक्काचे ‘लाल वाहन’ आलेच नव्हते. डोळ्यावरची धुंदी खाडकन उतरली. वसईतून एसटी बंद झाली होती. गेली ६० वर्षे अव्याहतपणे रात्रंदिवस सेवा देणारी एसटी बंद झाली होती. जनआक्रोश झाला. वसईच्या ग्रामीण भागातील शेतकरी, दूधवाले, रोजगारासाठी जाणारे हजारो चाकरमानी, विद्यार्थी, महिला यांच्या पोटात धस्स झाले. आता करायचे कसे हा मोठा प्रश्न पडला.. गेल्या काही महिन्यांपासून एसटी बंदच्या चर्चा ऐकू येत होत्या. पण त्याला कुणी गांभीर्याने घेतले नव्हते. पण १ जानेवारीला एसटी अचानक बंद झाली आणि ग्रामस्थांच्या हालाला सुरुवात झाली. चार दिवसांच्या आंदोलनानंतर एसटी महामंडळाने तीन महिन्यांसाठी तात्पुरती एसटी चालू ठेवायला परवागनी दिली. एसटी महामंडळाने केवळ तात्पुरता दिलासा दिलेला आहे. एसटी बंद होईल, पर्यायी व्यवस्था द्यायला पालिका तूर्तास तयार नाही. या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. वसईकरांचा आवाज कसा क्षीण होत चाललाय.. त्यांना सरकार प्रशासनाने कसे वाऱ्यावर सोडतेय तेही या निमित्ताने दिसून आले.

ग्रामीण भागातील लोकांचे एसटी हे हक्काचे वाहन. वसई-विरार शहर महापालिका आहे मग एसटीची काय गरज, असा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे. पण वसईची भौगोलिक रचना, सामाजिक आर्थिक परिस्थिती याचा विचार केला तर एसटी किती अनिवार्य आहे, त्याचा प्रत्यय येईल. वसई-विरार महापालिकेची स्थापना २००९ साली झाली. वसईचा पश्चिम पट्टा हा हिरवा पट्टा म्हणून ओळखला जातो. किनारपट्टीबरोबर निसर्गाचे वरदान लाभलेली विविध पिके घेणारी शेती आहे. भूमिपुत्रांना दूध, भाजीपाला, मासे आदीतून रोजगार मिळतो. या ग्रामीण भागातील जनतेचा महापालिकेला विरोध होता. महापालिकेत गावे सहभागी करून घेण्यात आली, पण आजही २९ गावांचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महापालिकेत गेल्यावर विकास होईल हे स्वाभाविक आहे. पण वसईकर जनतेला विकास हवा पण विकासाच्या नावावर स्वत:ला उद्ध्वस्त होऊ  द्यायचं नाही. त्यामुळे त्यांचा विरोध होता. महापालिका आल्यावर गावातून एसटी हद्दपार होईल ही भीती होती आणि आज तीच खरी ठरली आहे.

शिवसेना-भाजपची गोची

जनआंदोलन समितीत सर्वपक्षीय स्थानिक नेते आहेत. शिवसेना आणि भाजपची सर्वात मोठी गोची झाली. परिवहनमंत्री शिवसेनेचे असल्याने शिवसेनेला आपल्याच मंत्र्याविरोधात काही करता येत नव्हते. तर सत्ता भाजपची, मुख्यमंत्री भाजपचा असल्याने स्थानिक भाजप नेत्यांना तरीही हा निर्णय बदलता येत नव्हता. ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशी त्यांची स्थिती झाली होती. दिवसभर मंत्रालयात चकरा मारून त्यांचा पदरी निराशा पडत होती. जनआंदोलनात माजी आमदार विवेक पंडित यांची सक्रिय साथ नसल्याने आंदोलन हवे तेवढे प्रखर होत नव्हते हेही तेवढेच खरे होते. पालकमंत्र्यांनाही परिवहनमंत्र्यांनी जुमानले नाही. यापेक्षा आणखी शोकांतिका काय असू शकेल?

पालिकेला अडचण का?

पालिका म्हणते, सध्या आम्ही एसटीच्या मार्गावर सेवा देऊ  शकत नाही. एसटीने अद्याप आम्हाला आगाराची जागा दिलेली नाही. पालिकेची परिवहन सेवा शहराच्या बाहेर मुंबईपासून ठाणे, मुलुंड आदी १२ मार्गावर धावते. मग त्यांना शहराच्या शहरात सेवा देण्यास अडचण येते हे अजबच. ठाण्यात कुठे आगाराची जागा पालिकेकडे आहे? तिथे एसटीशी स्पर्धा करत सेवा दामटवतेय. मग तेच प्रयत्न शहरात का करत नाहीत? परिवहन ठेकेदार म्हणतो सेवा तोटय़ात चालली आहे. पण खचाखच भरलेल्या बस पाहता त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

एसटीने आगाराच्या जागा पालिकेला द्यायला हव्यात, तसा निर्णयही झालेला आहे. पण त्या जागा ताब्यात नाही, असे कारण पुढे करून सेवा न देणे हे सयुक्तिक वाटत नाही. २५ मार्गावर सेवा देणे कठीण नाही. पहिले चार दिवस एसटी बंद होती. तेव्हाही पालिकेच्या परिवहन सेवेने त्या मार्गावर लोकांचे हाल होत असताना सेवा दिली नाही हे दुर्दैवच.

एसटी का हवी?

* लाल रंगाच्या एसटीचे वसईच्या हिरवाईशी अतूट नाते आहे. गेली ६० वर्षे एसटी वसईत अविरत सेवा देत आहे. पहाटे तीनपासून मध्यरात्री दोनपर्यंत एसटी सेवा देते. तेही अगदी रास्त दरात. याच एसटीमुळे वसईची टवटवीत फुले, हिरवा-ताजा भाजीपाला, शुद्ध दूध मुंबईकरांना मिळते. वसईतला कष्टकरी समाज याच एसटीतून पिकवलेले निसर्गाचे धन नेत असतो आणि आपली उपजीविका चालवतो. भाजीचे गठ्ठे, करंडय़ा घेऊन तो उभा असताना पहाटेच्या काळोखात एसटी त्याच्या दाराशी येते.

* शेतकरी, कामगार हे सधन नाहीत. त्यांना एसटीच परवडते. रिक्षाचालक लूट करण्यास तयारच बसलेले आहेत. वसईत शेवटची लोकल येईपर्यंत एसटी थांबलेली असते. एक प्रवासी जरी असला तरी ती सुखरूप त्याला त्याच्या दाराशी पोहोचवते. त्यामुळे एसटीत बसणारा प्रवासी हा निर्धास्त असतो. मध्यरात्री तो कुणावर अवलंबून नसतो. त्या अंधारात घरापर्यंत जायला एसटीची सोबत असते.

* राज्यभरातून एसटीने शहरी भागातील एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शहरी भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी म्हणजेच महापालिकांनी आपली परिवहन सेवा त्या मार्गावर द्यावी, असे एसटीने म्हटले आहे. पण वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. परिवहन सेवा तोटय़ात सुरू असून शहरी भागातच तिची पूर्ण सेवा नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पालिका सध्या एसटीच्या मार्गावर बस सेवा देण्यास तयार नाही आणि सक्षमही नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 1:58 am

Web Title: msrtc resumes bus service on vasai virar route
Next Stories
1 अनैतिक प्रेमसंबंधातून महिलेची हत्या
2 तरुणाच्या हत्येप्रकरणातील आरोपी त्रिकुटाला अटक
3 मीरा-भाईंदरमध्ये भाजपला धक्का
Just Now!
X