ठाणे : मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या निर्माणाचे काम मुंब्रा रेतीबंदर खाडीकिनारी सुरू आहे. या उन्नत मार्गिकेवर रविवारी लोखंडी तुळई उभारण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील अवजड आणि खासगी वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मुंब्रा बाह्य़वळण मार्ग २४ तास बंद राहणार आहे. येथील वाहतूक पूर्व द्रुतगती मार्ग, नवी मुंबई, दुर्गाडी, ठाणे बेलापूर रोड या भागांतून वळविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ७०० पोलीस कर्मचारी आणि ५०० वाहतूक समन्वयक शहरातील महत्त्वाच्या मार्गावर तैनात करण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांच्या संघटनांना पत्रव्यवहार केला असून त्यांना वाहतूक बदलाची माहिती देण्यात आली आहे. तसेच ठाणे आयुक्तालय क्षेत्रात सकाळी ६ ते १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत अवजड वाहनांना परवानगी नाही. ही वाहने मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई शहरात मोकळय़ा जागांत थांबविली जाणार आहेत. ऐरोली आणि मुलुंड टोलनाक्यावर वाहतूक कोंडी झाल्यास तेथील वाहने तातडीने सोडण्यात यावी, अशा सूचनाही पोलिसांनी टोलनाका व्यवस्थापकांना दिल्या आहेत, अशी माहिती उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.