जयेश शिरसाट

पोलिसांचे खबरी हे प्रत्येक वेळी गुन्हा घडला तेथे हजर असतातच असे नाही. किंबहुना इकडून तिकडून उडत उडत आलेल्या माहितीचा माग काढत ते आपल्या परीने एखाद्या प्रकरणाचं चित्र रेखाटत असतात आणि मग ते पूर्ण करायला पोलिसांच्या हाती सोपवतात. टिटवाळय़ात तीन वर्षांपूर्वी घडलेल्या एका खून प्रकरणाचा उलगडा असाच एका व्यक्तीकडून दुसऱ्या आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे माहिती पोहोचल्याने झाला.

सातरस्ता कक्षातील पोलीस शिपाई ह्रदयनाथ मिश्रा यांचा एक ठेवणीतला खबरी बऱ्याच दिवसाने त्यांच्याकडे फिरकला. हा रिकाम्या हाती येणाऱ्यातला खबरी नव्हता. निश्चित मोठं काम मिळणार, हे मिश्रा जाणून होते. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेला, टिटवाळ्यात राहाणारा उमेश नावाचा तरुण तीन वर्षांपासून बेपत्ता आहे. खरं तर उमेशची हत्या त्याचा धाकटा भाऊ विजयने केलीये. हत्येनंतर उमेशचा मृतदेह टिटवाळ्याच्या नदीत फेकून देण्यात आला. गुन्हेगारी पाश्र्वभूमीमुळे उमेश कारागृहात असावा किंवा पोलिसांपासून लपतछपत असावा, असं समजून कुटुंबानेही शोधाशोध केलेली नाही.. अशी माहिती या खबऱ्याने मिश्रा यांना दिली. खबऱ्याची माहिती ऐकताना तपासाला सुरुवात कुठून करायची याचा विचार मिश्रा यांच्या मनात घोळू लागला. त्यांनी ही खबर कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निकुंभे यांना सांगितली आणि तपासचक्र सुरू झालं.

खबऱ्याच्या माहितीनुसार गुन्हा घडून तीन वर्ष लोटलेली. तपास सुरू करावा असा कुठलाच पक्का दुवा हाती नसताना सातरस्ता कक्षाने शून्यातून सुरुवात केली. खबऱ्याने मिळवलेल्या माहितीची खातरजमा करणं, हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा होता. त्यामुळे खबऱ्याने ज्या व्यक्तीकडून ही माहिती मिळवली त्याच्याशी चर्चा करून अधिक माहिती मिळवणं गरजेचं होतं. या व्यक्तीशी चर्चा केल्यावर हत्येची माहिती देणाऱ्या मुख्य स्रोतापर्यंत पोहोचण्यासाठी बरीच मेहनत करावी लागणार याची जाणीव पथकाला झाली. मुख्य स्रोतापर्यंत पोहोचण्यासाठी पथकाला पाच महिन्यांची प्रतीक्षा आणि परिश्रम करावे लागले.

टिटवाळा तालुक्यातील एका गावी दोन मित्र दारू पीत बसले होते. नशेत एकाने दुसऱ्याला उमेशच्या हत्येची माहिती दिली. माहिती देणारा हत्येनंतरच्या घडामोडींचा प्रत्यक्षदर्शी होता. बराच काळ तो प्रसंग छातीशी घट्ट कवटाळून बसलेल्या प्रत्यक्षदर्शीचा दारूच्या नशेत मन, मेंदूवरला ताबा सुटला आणि तो मित्रासमोर बरळलाच. त्याने सांगितलेली ही माहिती ऐकणाऱ्याने आपल्या जीवाभावाच्या

मित्राला सांगितली. या मित्रानेही पोलीस खबरी असलेल्या दोस्ताकडे मन मोकळं केलं. आपला दोस्त पोलिसांचा खबरी आहे याची जाणीव त्याला नव्हती. खबरी दोस्ताने या माहितीचं महत्त्व ताडलं आणि क्षणांत गुन्हे शाखेच्या सातरस्ता कक्षाचं कार्यालय गाठलं.

पाच महिन्यांत प्रत्येक पडाव पार करत पथकाने प्रत्यक्षदर्शीला गाठून नेमका प्रसंग जाणून घेतला. उमेश आणि त्याचा धाकटा भाऊ विजय यांच्यात दारूच्या नशेत अचानक वाद उफाळून आला आणि रागाच्या भरात विजयने उमेशची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावताना विजय प्रचंड भेदरला होता. त्यामुळे सोबतीसाठी त्याने प्रत्यक्षदर्शीला बोलावलं होतं. येताना कपडे आणि गोणी आणायला सांगितलं होतं. विजयने उमेशचा मृतदेह गोणीत भरून ती गोणी नदीत फेकून दिली होती.

पथकाकडे प्रत्यक्षदर्शीही होता आणि तीन वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येची बित्तंबातमीही होती. पण न्यायालयात आरोप सिद्ध करणारे पुरावे शोधण्यासाठी पथकाने गोपनीय तपास सुरू ठेवला. दुसऱ्या टप्प्यात उमेशच्या मृतदेहाबाबत माहिती मिळवली. सर्वप्रथम जेथून त्याचा मृतदेह नदीत फेकण्यात आला ती जागा तपासली. तो काळू नदीचा किनारा होता. हत्या घडली तेव्हा पावसाळा होता आणि नदी दुथडी भरून वाहत होती. पाण्याच्या वेगाचा अंदाज घेत मृतदेह वाहत वाहत कूठपर्यंत जाऊ शकतो, त्या परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये पथकाने चौकशी सुरू केली. नदीत वाहून आलेले पण ओळख न पटलेल्या, बेवारस मृतदेहांची माहिती मिळवली. एका पोलीस ठाण्यात पथकाला हव्या असलेल्या मृतदेहाबाबतची कागदपत्रे आढळली. सप्टेंबर २०१६च्या मध्यावर एका तरुणाचा मृतदेह पिसे धरणात सापडला होता. आठवडाभर पाण्यात राहिल्याने मृतदेह ओळख पटण्यापलीकडे होताच, पण शवचिकित्सेतून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल इतपतही उरला नव्हता. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत हे प्रकरण बंद केलं होतं. गुन्हे शाखेच्या पथकाने उमेशचे अस्तित्व जाणून घेण्यासाठी आर्थररोड, तळोजा, ठाणे, कल्याण येथील कारागृहांमधून माहिती मागवली. त्याच्याविरोधात मुंबईसह आसपासच्या शहरांत सप्टेंबर २०१६च्या अलीकडे नवा गुन्हा दाखल आहे का याचीही खातरजमा केली. ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात उमेश तळोजा कारागृहातून बाहेर पडला, अशी नोंद पथकाला आढळली. त्यानंतर दोन आठवडय़ांनी हा मृतदेह पिसे धरणात आढळला होता. त्यामुळे हा मृतदेह उमेशचाच असावा या ठोस अनुमानाने पथक मुंबईच्या लोकमान्य टिळक मार्गावरील हार्डवेअरच्या दुकानात काम करणाऱ्या विजयसमोर उभं ठाकलं.

उमेशबाबत चौकशीला सुरुवात झाल्यावर जराही न भांबावता विजयने खोटी उत्तरं देण्यास सुरुवात केली. दोन महिन्यांपूर्वी दुकानावर आला होता, पण त्यानंतर भेट झाली नाही, असेल एखाद्या कारागृहात, हे उत्तर ऐकताच पथकाने त्याची गचांडी आवळली. विजयला ताब्यात घेत कक्ष कार्यालयात आणण्यात आलं. तिथेही तो खोटंच रेटत होता. पण उमेशच्या हत्येनंतरच्या घडामोडींचा प्रत्यक्षदर्शी पथकाने आधीच ताब्यात घेतल्याचं समजताच विजयकडे खरं बोलण्यावाचून पर्याय नव्हता.

उमेश सुरुवातीपासून गुन्हेगार प्रवृत्तीचा होता. वयात आल्याबरोबर त्याच्या गुन्हयांचा आलेख वाढू लागला. चोरी, घरफोडी, मारहाण असे अनेक गुन्हे त्याच्या नावे नोंद होऊ लागले. त्यामुळे तो घरी फारसा नसेच. तळोजा कारागृहातून सुटल्यावरही तो आठवडय़ाने दुकानावर आला होता, अशी माहिती विजयने दिली. ‘तेथे आम्ही मनसोक्त दारू ढोसली. तिथून टिटवाळा स्थानकात उतरल्यानंतर उमेशने आणखी दारू पिण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या हट्टाखातर आणखी दारू प्यायलो. मात्र, त्यानंतरही त्याचं समाधान होईना. तो माझ्याकडून पैसे मागू लागला. मी नकार दिल्यावर तो माझ्या अंगावर धावून आला. मीही रागाच्या भरात त्याच्या डोक्यावर दारूची

बाटली फोडली आणि त्याच काचेने त्याच्यावर वार केले. भानावर आला तेव्हा समोर उमेशचा मृतदेह होता,’ असे विजयने आपल्या कबुलीजबाबात सांगितले. गुन्हा लपवण्यासाठी त्याने उमेशचा मृतदेह नदीत फेकला. त्यानंतर तो तुरुंगात असल्याचं तो सतत कुटुंबाला सांगत होता. त्यामुळे इतके दिवस कोणालाच विजयच्या बेपत्ता होण्याचा संशय आला नाही. मात्र, पोलिसांकडे एका खबऱ्याने दिलेल्या माहितीने त्याचं बिंग फोडलं.