चौपट शुल्क आकारल्याने रुग्ण, नातेवाईक हैराण

डोंबिवली : करोना महामारीच्या नावाखाली इतर आजारांनी त्रस्त रुग्णांचीही लूट सुरू आहे. उपचार देणारे डॉक्टर आणि खासगी चाचणी केंद्रांचे चालक संगनमताने चाचणीच्या नावाखाली चार पट वाढीव शुल्क आकारत असल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला.

रुग्ण आणि त्याचे नातेवाईक या वाढीव रकमा पाहून आवक झाले. अधीच जुळवाजुळव करून उभी केलेली खर्चाची रक्कम. त्यात खासगी डॉक्टर, चाचणी तपासणी केंद्र (पॅथ लॅब) चालक रुग्णांची महामारीच्या नावाने लूट करत आल्याने रुग्ण, नातेवाईक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात एक सामान्य आजाराचा रुग्ण उपचार घेत होता. त्याच्या काही चाचण्या करणे आवश्यक असल्याने डॉक्टरांनी त्याच्या नातेवाईकांना रुग्णाला संबंधित खासगी चाचणी केंद्राच्या (पॅथॉलॉजी लॅब) माध्यमातून चाचण्या करण्यास सांगितले. तीन ते चार चाचण्या डॉक्टरांनी सुचविल्या होत्या. त्याप्रमाणे रुग्णाच्या खासगी चाचणी केंद्रातून चाचण्या करण्याचे निश्चित केले. या चाचण्यांसाठी २१ हजार रुपये खर्च येईल असे डोंबिवलीतील चाचणी केंद्र चालकाने सांगितले. गंभीर आजाराच्या चाचणीचेही एवढे शुल्क आकारले जात नाहीत, मग एवढय़ा चाचण्या कसल्या केल्या जात आहेत, अशी विचारणा नातेवाईकांकडून करण्यात आली. चाचणीसाठी तेवढा खर्च येतोच, असे उत्तर मिळाल्यानंतर अखेर एका जाणकाराने चाचणी केंद्र चालकाला संपर्क करून तुम्ही रुग्णाच्या कोणत्या चाचण्या करता याची माहिती देण्याची मागणी केली. केंद्र चालकाने सुरुवातीला डॉक्टरने ज्या चाचण्या सांगितल्या त्याच चाचण्या करतो असे सांगितले. जाणकाराला आपण रुग्णाच्या करीत असलेल्या चाचण्यांची माहिती व्हॉट्सअ‍ॅप माध्यमातून कळविली. या चाचण्यांची माहिती ठाण्यातील एक तज्ज्ञ डॉक्टरकडून घेतली असता  या चाचण्यांसाठी अवघे चार ते पाच हजार रुपये खर्च येत असल्याचे समोर आले. चाचणी केंद्र चालकाला पैसे थोडे कमी करा. एवढी रक्कम रुग्णाकडे नाही असे सांगितल्यानंतर १० हजार रुपयांमध्ये या चाचण्यात रुग्णाला करून दिल्या. चाचणी केंद्र चालक आणि डॉक्टरांमधील साटेलोटे या माध्यमातून उघड झाले आहे. यामध्ये डॉक्टरचे आर्थिक नुकसान झाल्याने लगेच डॉक्टरने रुग्णाला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवावा लागेल. त्याला तुम्ही येथून अन्यत्र स्थलांतरित करा अशी टूम काढली. रुग्ण, नातेवाईकांना हैराण करण्याचे असे प्रकार सुरू आहेत.

आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार?

करोना महामारीच्या नावाखाली काही खासगी डॉक्टर, काही खासगी चाचणी केंद्र चालक यांच्या साटय़ालोटय़ातून (कट प्रॅक्टिस) रुग्णांकडून अवाच्या सवा शुल्क आकारत असल्याने रुग्ण, नातेवाईक हैराण आहेत. आपण हा प्रकार राज्याचे आरोग्यमंत्री, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या लेखी तक्रारीद्वारे निदर्शनास आणणार आहोत, असे प्रमोद खानविलकर या निकटवर्तीयाने सांगितले.