पत्रीपुलाच्या कामामुळे होणाऱ्या मेगा ब्लॉकदरम्यान ६० बसफेऱ्या

लोकसत्ता प्रतिनिधी

कल्याण : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील वर्दळीच्या पत्रीपुलावरील नवीन पुलाच्या कामाची तुळई ठेवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या चार दिवसांच्या मेगा ब्लॉकच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने विशेष ६० बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बदलापूर, टिटवाळा, विठ्ठलवाडी, कल्याण-डोंबिवली शहरांच्या दरम्यान या बसेस धावणार आहेत. प्रवासी संख्या वाढली तर त्याप्रमाणे या बससंख्येत वाढ करण्यात येणार आहे. दर १० मिनिटांनी रेल्वे स्थानकांजवळून या बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती आगार व्यवस्थापक संदीप भोसले यांनी दिली.

मध्य रेल्वेतर्फे शनिवारी सकाळी १०.१५ ते दुपारी २.१५  वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत डोंबिवली ते कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान धावणाऱ्या उपनगरीय लोकल सकाळी ९.५० ते दुपारी २.१५ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत कल्याण ते कर्जत-कसारादरम्यान विशेष लोकल्स चालविल्या जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला, ठाणे, डोंबिवलीदरम्यान विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. या कालावधीत बदलापूर, टिटवाळा, कल्याण परिसरांतून मुंबईत जाणाऱ्या आणि मुंबईतून कल्याण, डोंबिवलीकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होऊ नयेत, कल्याण-डोंबिवलीदरम्यान लोकल सेवा बंद असली तरी त्यांना इच्छित स्थळी जाता यावे या उद्देशातून केडीएमटीने रेल्वे प्रशासनाच्या मागणीवरून विशेष बस सेवांचे नियोजन केले आहे.

अशाच प्रकारचे नियोजन रविवारी, येत्या आठवडय़ातील शुक्रवार ते रविवारदरम्यान केडीएमटी प्रशासनाने केले आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांजवळील बस थांब्यांजवळ प्रवाशांची गर्दी होऊ नये, करोना संसर्गाचे सर्व नियम पाळण्यात यावेत या उद्देशातून मार्ग तपासनीसांची नेमणूक करण्यात येणार आहे. या विशेष बसेसव्यतिरिक्त डोंबिवलीतून बाजीप्रभू चौकातून एमआयडीसी निवासी, लोढा हेवन, खोणी, भोपर, नवनीतनगर, वाशी या मार्गावर १० बसेस उपलब्ध असणार आहेत. कल्याणमध्ये १५ विशेष बसेस उपलब्ध असतील. या बसेस कल्याणमध्ये रिंगरुट, मोहने वसाहत, गोदरेज हिल, वाशी, पनवेल, भिवंडी, उंबर्डे, मलंगगड मार्गावर धावणार आहेत. कल्याण-डोंबिवली ते ठाणे मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून वाढीव बसेस, त्याप्रमाणे वाहक, चालक उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

एसटी आणि टीएमटीच्याही अतिरिक्त बसेस

शनिवार आणि रविवारी पत्रीपुलाच्या कामासाठी रेल्वेतर्फे ट्राफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी एसटी आणि टीएमटी प्रशासनातर्फे अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. कल्याण आणि डोंबिवलीहून ठाण्याला जाण्यासाठी एसटी महामंडळाने ६० बसगाडय़ा सोडण्याचे नियोजन आखले आहे, तर टीएमटीतर्फे ठाणे-कल्याण मार्गावर २५ बसेस सोडण्यात येणार आहेत.

वाहतूक पोलिसांचे नियोजन

पत्रीपुलावर तुळई टाकण्याच्या वेळी घेण्यात येणाऱ्या ब्लॉकदरम्यान हलक्या वाहनांना पुलावर जाण्या-येण्याकरिता प्रवेश सुरू राहणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवाशांना त्यांची खासगी वाहने उभी करण्याकरिता डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे मैदानात वाहतूक पोलिसांनी परवानगी दिली आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी रिक्षा आणि टॅक्सीचालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून शनिवारी आणि रविवारी कल्याण ते डोंबिवली या प्रवासासाठी जास्तीत जास्त रिक्षा आणि टॅक्सी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर या वेळेत चालकांकडून अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्याही सूचनाही देण्यात आल्या आहेत.

बस मार्ग शनिवार, रविवारचे नियोजन

  • कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक येथून सुटणाऱ्या बसेस शहाड उड्डाणपूल, श्रीराम सिनेमागृह, पुना जोडरस्तामार्गे, पेंढरकर महाविद्यालयमार्गे डोंबिवलीत बाजीप्रभू चौक येथे येतील.
  • ’विठ्ठलवाडी पूर्व रेल्वे स्थानक येथून खंबाळपाडामार्गे बस डोंबिवलीत येईल. कल्याण बदलापूर बस उल्हासनगर मार्गे कल्याणमध्ये येईल.
  • ’ कल्याण-टिटवाळा बस मोहना गेट मार्गे टिटवाळा येथे पोहोचेल.

रात्र बसचे नियोजन

शुक्रवार ते रविवारदरम्यान दररोज रात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रेल्वेतर्फे मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळेत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून केडीएमटीने नऊ बसेसचे कल्याण, डोंबिवली, बदलापूर, टिटवाळादरम्यान नियोजन केले आहे. प्रवासी संख्या वाढली तर या बसेस वाढविण्यात येणार आहेत. यापूर्वीच्या नियोजित मार्गाने या बसेस धावतील.

मेगा ब्लॉक काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाच्या मागणीप्रमाणे चार दिवस विशेष बस सेवा चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष कर्मचारी वर्ग या कामासाठी नियुक्त केला आहे. प्रवासी वाढले तर तात्काळ बससंख्या आणि फेऱ्या वाढविण्यात येतील.
संदीप भोसले, आगार व्यवस्थापक, केडीएमटी.