भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. एमआयडीसीकडून मिळणाऱ्या पाण्यात घट झाल्याने ही टंचाई निर्माण झाल्याचे पालिकेने सांगितले. दरम्यान, पेणकर पाडामधील ग्रामस्थांचा कळशी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मीरा-भाईंदर शहरात अनेक भागात पाण्याची समस्या अधिक जटिल होत चालली आहे. शहराला  मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा उपलब्ध होत असला तरी अनेक भागात पुरेशा प्रमाणात पाणी पोहचत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. सध्या देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे स्वच्छता राखण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत  सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण  निर्माण झाले असतानाच  पाण्याचा तुटवडादेखील भासत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शहरात वाढत असलेल्या नवीन इमारती संख्येमुळे जुन्या इमारतीच्या पाणीपुरवठय़ात घट झाली आहे. भाईंदर पूर्वकडील रामदेव पार्क, क्वीन्स पार्क त्याचप्रमाणे काशी नगर, पेणकरपाडा आदी भागात काही  दिवसापासून कमी दाबाने पाणी येत आहे. तसेच मीरा रोड येथील पेणकरपाडा परिसरात पाणीटंचाईची समस्या अधिक भासू लागली आहे. त्याचप्रमाणे या भागात राहणाऱ्या नागरिकांना रात्री १ च्या सुमारास पाणीपुरवठा होत आल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन वेळापत्रक बिघडले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात यांवर तोडगा न काढल्यास पाणीपुरवठा विभागाबाहेर मोकळ्या कळश्या घेऊन आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक महिला रहिवासी सविता पाटील यांनी दिला आहे.

एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा  गेल्या दहा दिवसापासून २० ते ३० एमएलडी कमी होत आहे. या संदर्भात प्रशासनाचे बोलणे झाले असून दोन दिवसात प्रश्न सुटेल.

– सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग