News Flash

महामार्गावर ‘धूळके’

सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे धूळ आणि धुके यांचे मिश्रण वाहनचालक आणि प्रवाशांना अधिक त्रासदायक ठरू लागले आहे.

|| ऋषिकेश मुळे-सागर नरेकर

धुक्यासोबत धुळीचाही मारा होत असल्याने प्रवास त्रासदायक;विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांचा परिणाम

ठाणे : जिल्ह्य़ातील निरनिराळ्या भागांत सुरू असणारी रस्ते तसेच इतर विकास प्रकल्पांच्या कामांमुळे महामार्ग तसेच प्रमुख रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर धुळीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र असून या भागातून नियमित प्रवास करणाऱ्यांना श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांत सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे धूळ आणि धुके यांचे मिश्रण वाहनचालक आणि प्रवाशांना अधिक त्रासदायक ठरू लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून हवेतील गारवा वाढू लागला असून ठाणे जिल्ह्यातील महामार्ग तसेच मुख्य रस्त्यांवर सकाळी आठ वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरलेली दिसते. धुक्यामुळे हवा जड होत असतानाच विकासकामे सुरू असलेल्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ यांत मिसळून तिचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. धूळ आणि धुके यांच्या मिश्रणामुळे होणारे ‘धुळके’ श्वसनविषयक आजारांना निमंत्रण देत आहे, असे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे.

ठाणे शहरात मेट्रो आणि कोपरी पूल रुंदीकरणाचे कामे वेगाने सुरू आहे. तसेच नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन या भागात सेवा रस्त्यांची आणि भास्कर कॉलनी आणि ज्ञानेश्वर नगर येथे रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. या कामांमुळे सर्वत्र धुळीचे वातावरण तयार झाले आहे. त्याचबरोबर भिवंडी शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे कामे सुरू आहेत. रांजणोली नाका येथे उड्डाणपुलांची कामे सुरू असून या महामार्गावर धुळीचे अक्षरश: लोट उडत असल्याचे चित्र आहे. उड्डाणपुलाचे काम करताना उडणाऱ्या धुळीचे प्रमाण कमी व्हावे याची दक्षता ठेकेदाराने घ्यावी असे आर्जव प्रवासी करत आहेत.

कल्याण-बदलापूर रस्त्यावरही धुळीचे साम्राज्य

कल्याण बदलापूर रस्त्याचे काम गेले काही दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. अंबरनाथ शहरातील साईबाबा मंदिर ते फॉरेस्ट नाका या पट्टय़ाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या कामात सुरू असलेल्या खोदकामामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनचालकांना नाक दाबून येथून प्रवास करावा लागतो आहे. तर आसपासची घरे आणि दुकानांमध्ये धुळीचा थर साचताना दिसतो आहे. त्यात सकाळच्या वेळी कंपन्यांमधून सोडला जाणारा वायू, धुके आणि धूळ यांच्या मिश्रणाचा फटकाही सहन करावा लागतो आहे.

जिल्ह्य़ात धुळीचे वातावरण तयार होऊन ही धूळ सर्वदूर पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. सर्दी, खोकला, डोकेदुखी यासारखे साथीच्या आजार जडलेल्या रुग्णांमध्ये संख्या वाढू लागली आहे. याकाळात नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे. – कैलास पवार, शल्यचिकीत्सक ठाणे जिल्हा रूग्णालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 1:49 am

Web Title: project work dusty atmosphere pollution akp 94
टॅग : Pollution
Next Stories
1 ‘लोकांकिका’ची आज ठाण्यात पहिली घंटा!
2 रिक्षातून माहितीदर्शक स्मार्ट कार्ड गायब
3 कल्याणमधील ‘म्हाडा’ची घरे लाभार्थीसाठी सज्ज
Just Now!
X