कोकणात पक्षी निरीक्षणासाठी फिरत होतो. सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. एका पायवाटेवर मऊ मातीत बिबळ्याच्या पायाचा ठसा दिसला. अगदी ताजा. सायंकाळी पाच वाजताच हा पठ्ठय़ा बाहेर पडून गावाच्या इतक्या जवळ काय करतोय बघू या म्हणून मी अजून ठसे शोधू लागलो. लगेचच मला देवराईकडून वरच्या कातळाकडे जाणारे पावलांचे ठसे दिसायला लागले. या परिसरातून बिबळ्या गेला असेल, असा अंदाज बांधून मीही त्या ठशांच्या मागे जाऊ लागलो. घाटी चढून थोडासा श्वास लागलेला. एका मोठय़ा दगडावर चढून बसलो. एक घोट पाणी प्यायलो. सहा वाजायला आले होते. बॅगेमध्ये बॅटरी आहे हे परत एकदा पडताळून पाहिले आणि आत निघणार तोच मागच्या झाडावरून अचानक मोठ्ठा गुरगुरल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ अक्षरश: डरकाळी. आता म्हणजे मी जवळजवळ दगडावरून खालीच पडलो. एक सेकंद सुन्न गेला. भीतीची लहर निघून गेल्यावर स्वत:ला शिव्या दिल्या. ‘तुला कोणी सांगितला होता नसता शहाणपणा.’ आत्मनिंदेच्या दहा ते पंधरा सेकंदांच्या राऊंडनंतर या सगळ्यात गेलेल्या साधारण एक मिनिटाच्या कालावधीनंतर भान आल्यावर झाडावर आवाज कुठून येतो आहे ते बघितले आणि जी काही मनामध्ये विविध भावनांची कोशिंबीर झाली ती अवर्णनीय आहे. झाडावर धनेश पक्ष्याची एक जोडी येऊन बसली होती आणि ते हा भुंकल्यासारखा, गुरगुरल्यासारखा आवाज काढत होते. मग बिबळ्या विसरून या दुर्मीळ अशा धनेशांच्या जोडीचे निरीक्षण करू लागलो.
धनेश गरुड म्हणजेच ग्रेट पाइड हॉर्नबील. हा कोकणात सापडणारा एक दुर्मीळ पक्षी आहे. याचे नाव गरुड केवळ त्याच्या प्रचंड मोठय़ा आकारामुळे आहे. प्रत्यक्षात हा काही शिकारी पक्षी नाही. साधारणत: घारीच्या दुप्पट आकाराचा हा पक्षी फलाहारी आहे. पण त्यासोबत तो झाडावरचे छोटे साप, पालीही खातो. याच्या मोठय़ा चोचीवर अजून एक चोचीसारखाच शिंगासारखा टणक भाग असतो, म्हणून याला शिंगचोचा असेही म्हणतात. नारंगी-पिवळी चोच, डोळ्यामागे काळा पट्टा, पिवळी मान आणि छाती काळी, पाठ आणि पोट लांब, शेपटी काळा आणि पांढरा पट्टा असलेली. असा हा धिप्पाड राजेशाही पक्षी. हा इतर कुठल्याही पक्ष्याशी मिळताजुळता नाही. गेल्या काही वर्षांत झालेल्या अफाट शिकारीमुळे कोकणातून खरे तर हा पक्षी जवळपास नामशेषच झाला आहे. इतरत्र भारतभरही हीच परिस्थिती आहे. सुरेख पिसे आणि चविष्ट मांस यासाठी धनेश पक्ष्याची मोठय़ा प्रमाणावर शिकार होते.
या पक्ष्यांची संख्या कमी होण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे यांच्या घरटे करण्याच्या निराळय़ा पद्धती. हे पक्षी मोठय़ा झाडाच्या ढोलीत घरटे करतात. मादी ढोलीत जाते आणि नर-मादी मिळून आतून-बाहेरून ढोलीचे तोंड शेण, माती, विष्ठा वापरून लिपून टाकतात. फक्त चोच बाहेर येईल इतकीच फट शिल्लक असते. पिलांच्या सुरक्षततेसाठी मादी स्वत:ला कोंडून घेते आणि नर पिल्ले ढोली फोडून बाहेर येईपर्यंत मादी आणि पिल्लांसाठी फळे आणून भरवत असतो. अशा वेळी जर का नराची शिकार झाली तर मादी आणि पिल्ले उपासमारीने मरतात. जंगलांमध्ये चाललेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळेही त्यांच्या संख्येवर परिणाम होतो. घरटे करण्यासाठी आवश्यक असलेले मोठे वृक्ष हे लाकूडतोडय़ांनी तोडल्याने घरटय़ांसाठी जागा नसल्याचा मोठा प्रश्न या पक्ष्यांसमोर आहे. कोकणात सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांमध्ये पडणारा तुफान पाऊस या पक्ष्यांना थोडेफार स्थलांतर करायला लावतो. पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी असेच पावसाळी स्थलांतर केलेल्या एका धनेशाची नोंद २००६ साली चक्क सातारा शहरात केलेली आहे.