आयओडी’तील बांधकामांना चोरून पाणीपुरवठा; अधिकाऱ्यांचे साटेलोटे

कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीकपातीमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यात आठवडय़ातून दोन दिवस पाणी बंद राहत असल्याने शहराच्या अनेक भागांत रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. एकीकडे रहिवासी घरगुती वापरासाठी पाणी मिळावे यासाठी भटकंती करीत आहेत, तर दुसरीकडे भूमाफिया पालिका अधिकाऱ्यांसमोरून बिनधास्तपणे पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून बांधकामांसाठी चोरून पाणी घेत आहेत.

कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा परीघ क्षेत्रात बेसुमार बेकायदा चाळी, गाळे, इमारतींची बांधकामे केली जात आहेत. काही भागांत नगररचना विभागाने दिलेल्या अंतरिम बांधकाम परवानगीवर (आय.ओ.डी.) बांधकामे सुरू असल्याची चर्चा आहे. या सर्व बांधकामांना पालिकेच्या जलवाहिनीवरून चोरून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे रहिवाशांना ज्या दाबाने पाणी मिळणे आवश्यक आहे, ते मिळणे दुरापास्त झाले आहे.

पाणीकपातीनंतर पालिका बेकायदा चाळी, गाळे, इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करील. बेकायदा चाळींना पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक ठिकाणी ५० ते १०० च्या संख्येने बुस्टर बसविण्यात आले आहेत. ही चोरीची प्रकरणे अधिकाऱ्यांकडून बंद केली जातील, पण अधिकारी या विषयावर मूग गिळून आहेत. त्यामुळे भूमाफिया बिनधास्तपणे चोरून पाणी वापरत आहेत.

सोसायटय़ांना टँकरही नाही

प्रभाग क्षेत्र कार्यालयांमधून पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उलटापालट करून माफियांना नळजोडण्या देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे काही ठेकेदारांकडून सांगण्यात येते. करभरणा केला नाही म्हणून अनेक सोसायटय़ांचा पाणीपुरवठा पालिकेने खंडित केला आहे. त्यांना पाण्याचा टँकरही पालिकेकडून देण्यात येत नाही. त्यामुळे रहिवाशांचे पाण्यासाठी दुहेरी मरण झाले आहे.

आयुक्त ई. रवींद्रन यांनी पाणीचोरीच्या पालिका हद्दीतील सर्व जोडण्या तोडण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करदात्यांकडून करण्यात येत आहे.