एकूण १५ विद्यार्थी घेऊन निघालेली सहा आसनी रिक्षा अतिभारामुळे तीव्र उतरणीला उलटून झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्यांला आपले प्राण गमवावे लागले, तर अन्य विद्यार्थी जखमी झाले. यश अरुण पाटील (वय १३) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून तो आठवीत शिकत होता. पनवेल तालुक्यातील दुंदुरे गावी शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे मेंढरांप्रमाणे कोंबून विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
रमजान ईदनिमित्त सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली असताना केवाळे येथील ‘रामकृष्ण अकादमी’च्या शाळेने मात्र विद्यार्थ्यांना वर्गात हजर राहण्यास सांगितल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. दुपारी दीड वाजता ही शाळा सुटल्यानंतर हे विद्यार्थी रिक्षातून घरी निघाले होते. रिक्षाचालक मच्छिंद्र पाटील यांनी या रिक्षात प्रमाणापेक्षा अधिक म्हणजे १५ विद्यार्थी कोंबले होते. हरिग्राम-केवाळे ते दुंदरे रस्त्यावरील एका तीव्र उतारावर रिक्षाचालक मच्छिंद्र यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि ती शेतात जाऊन कलंडली. मुले एकमेकांच्या अंगावर पडली, ठेचकळली. यश पाटील हा बाहेर फेकला गेला आणि त्याच्या अंगावर रिक्षा पडली. त्यात त्याची शुद्ध हरपली. काही ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांना बाहेर काढले. यश याला पनवेलमधील गांधी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अन्य जखमींवर नेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या प्रकरणी रिक्षाचालक पाटील यांना अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात वाहतूक शाखेच्या कारवाईला न घाबरता काही जण सहाआसनी रिक्षा, तसेच वाहनांमधून क्षमतेहून अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. एखाद्या दुर्घटनेनंतर येथील बेकायदा प्रवासी वाहतुकीविरोधात कारवाई केली जाते, परंतु त्यानंतर हा प्रकार सुरू होतो, अशा तक्रारी येथील नागरिकांनी केल्या आहेत.