गणित हा बहुतांश विद्यार्थ्यांसाठी कंटाळवाणा विषय असतो. आकडेमोड आली की झोप येते, अचानक अभ्यास करायचा कंटाळा येतो, अशी या मुलांची तक्रार असते; पण हेच गणित विद्यार्थ्यांना रंजकपणे समजावून सांगितले तर?.. ‘शुगर मॅथ’ नावाचे अ‍ॅप नेमकं हेच काम करण्यासाठी निर्माण झालं आहे.

आयआयटी खरगपूर येथून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदवी मिळवल्यानंतर नीरज जेवाळकर या तरुणाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला; पण त्यांना मुलगा झाल्यानंतर त्यांनी तो व्यवसाय विकून मुलासाठी वेळ देण्याचा ठरविला. त्यांचा मुलगा जेव्हा शाळेत गेला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, आज सर्व गोष्टींसाठी मोठय़ा प्रमाणावर तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मात्र शिक्षणासाठी त्या तंत्रज्ञानाचा पुरेसा वापर केला जात नाही. विशेषत: गणित, विज्ञान आणि इंग्रजी यांसारख्या विषयांमध्ये मुलांना नेहमी अडचण येत असते. ही अडचण दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने हे विषय सोपे करता येऊ शकतात, असे त्यांच्या मनात आले; पण शिक्षणात तंत्रज्ञान आणण्यासाठी शिक्षण पद्धतीचा अभ्यास असणे गरजेचे आहे हे त्यांनी ताडले आणि मेंदूशी संबंधित संशोधनांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. तब्बल सात वर्षांच्या अभ्यासामध्ये त्यांनी जगभरातील मेंदूच्या संशोधनांचा सखोल अभ्यास केला. त्या वेळी त्यांच्या लक्षात आले की, आपल्या मेंदूत शिक्षण आत्मसात करण्याच्या काही पद्धती असतात. या पद्धतींचा अभ्यास करून जेवाळकर यांनी तंत्रस्नेही असे ‘व्हेरिएबल कीस्टोन अ‍ॅक्टिव्ह स्पेस टेक्निक’ (व्हीकास्ट) तंत्र विकसित केले. या तंत्राच्या साह्य़ाने मेंदूतील सर्व विभागांना चालना मिळते. त्याचबरोबर शिकण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. यानंतर सीबीएसई, आयसीएसई, आयबी, राज्य मंडळांच्या गणिताचा अभ्यास करून मग जेवाळकर यांनी ‘सुगर मॅथ’ या अ‍ॅपची निर्मिती केली.

या अ‍ॅपमध्ये सर्व अभ्यास मंडळांच्या गणिताचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. गणिताचे वेगवेगळे धडे शिकवण्यासाठी विविध पायऱ्या देण्यात आल्या आहेत. या पायऱ्यांनुसार गणिताचे कौशल्य आपण आत्मसात करतो. पहिली ते दहावीचा अभ्यासक्रम यामध्ये देण्यात आला आहे. यातील पायऱ्या मेंदू विज्ञानाचा विचार करून विकसित करण्यात आल्याचे जेवाळकर यांनी सांगितले. याशिवाय विद्यार्थ्यांना गणित अगदी सोपे जावे यासाठी प्रत्येक पाठ शिकवण्यासाठी विविध खेळ तयार करण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थी जसे एक एक टप्पे पूर्ण करत जातील तसे त्यांना आभासी पैसे मिळत जातात. या पैशांमधून ते आभासी जगात आपल्या प्रिय व्यक्तींसाठी भेटवस्तू खरेदी करू शकतात.

गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत

ही कंपनी स्थापन करण्यासाठी सुरुवातीला स्वत: जवळचा निधी गुंतवून कंपनीची उभारणी केली आहे. आता निधी उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांकडून निधी उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. या अ‍ॅपमध्ये सुरुवातीचा काही भाग हा मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे, तर अद्ययावत भाग हवा असल्यास वर्षांला ९९९ रुपये आकारले जातात. हेच कंपनीचे उत्पन्न असल्याचेही जेवाळकर यांनी सांगितले.

भविष्यातील वाटचाल

सध्या या अ‍ॅपच्या विपणनावर विशेष काम सुरू असून हे अ‍ॅप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यात या अ‍ॅपमध्ये विज्ञान विषयाचाही समावेश करण्याचा मानस जेवाळकर यांनी बोलून दाखविला.

नवउद्यमींना सल्ला

नवउद्योग सुरू करताना आपण कोणती समस्या घेऊन काम करतो ते पाहणे महत्त्वाचे आहे. त्यावर काम करण्यासाठी वेळ देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ते झाल्यास तुम्हाला यश मिळू शकते, असा सल्ला जेवाळकर यांनी दिला. नवउद्योग हा एका रात्रीत मोठा होईल, अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. ती एक प्रक्रिया आहे ती पूर्ण होणे तितकेच महत्त्वाचे आहे. एकदा का आपल्याला आपल्या कामाची व्याप्ती लक्षात आली की, त्या दृष्टीने वाटचाल करणे कधीही योग्य ठरेल, असेही ते म्हणाले.

नीरज पंडित

@nirajcpandit