फुलपाखरांमध्ये काही फुलपाखरे अशी असतात की ज्यांचे रूप निसर्गातील बदलांप्रमाणे बदलते. हा बदल लक्षात येण्यासारखा नक्कीच असतो.
प्लम ज्युडी हे अशापैकी एक फुलपाखरू आहे. ही लहान फुलपाखरं मरून व खाकी किंवा तपकिरी रंगाची असतात. या पावसाळ्यातील वेट सिझन फॉर्म आणि इतर काळातील ड्राय सिझन फॉर्म अशी दोन रूपे एकाच वर्षांत बघायला मिळतात.
या दोन्ही प्रकारांमध्ये फुलपाखरांचा रंग सारखाच मरून तपकिरी असतो, पण पावसाळ्यात आढळणाऱ्या नर फुलपाखरांच्या पंखावर एक जांभळी चमकदार छटा असते. जी इतर कालावधीमध्ये दिसणाऱ्या फुलपाखरांमध्ये नसते. मादी फुलपाखरांमध्ये मात्र असा फरक आढळत नाही. मात्र नर आणि मादी दोन्ही फुलपाखरांच्या पंखांचे रंग हे पावसाळ्यातील फॉर्ममध्ये गडद असतात. तर इतर प्रकारात ते फिके असतात. तर मागील पंखावर (हाईड विंग) बारीक पोकळ ठिपक्यांची माळ पंखांच्या टोकाला असते.
ही फुलपाखरं आपल्याला निसर्गात अगदी सहज ओळखायला येतात ते त्यांच्या विशिष्ट लकबीमुळे. जमिनीवर बसताना ते एकतर त्याच्या रंगाशी मिळतेजुळते असे क्षेत्र म्हणजे वाळून गेलेली पाने असलेली जागा निवडतात. शिवाय ती कधीही स्वस्थ बसत नाहीत. इतर फुलपाखरांप्रमाणे पंख उघडझाप करतातच. शिवाय सारखी स्वत:भोवती गिरक्याही घेत राहतात. एका गिरकीत ज्या बाजूला डोके असते त्याच्या विरुद्ध बाजूला ते जातात. ही गिरकी १८० अंशात असते. म्हणून त्यांना नाचरे फुलपाखरू असेही म्हणतात. अर्थात ते सर्व भक्षकांना चकविण्यासाठीच असते. ही फुलपाखरे प्रायम्युकिसे झाडांवर त्यांची अंडी घालतात. या कुळातील झाडांना छोटी छोटी फळं लगडतात. यावरूनच या फुलपाखरांना प्लम ज्युडी हे नाव पडले आहे. या फुलपाखरांचे सुरवंट हे हिरव्या रंगाचे मध्यभागी फुगीर आणि दोन्ही बाजूला निमुळते झालेले असतात. त्यांच्या अंगावर अतिशय बारीक लव असते. त्यांचे कोश हे सुरवंटासारखेच दिसतात. संपूर्ण दक्षिण आशियामध्ये ही फुलपाखरे बघायला मिळतात. भारतात हिमालयातील कुमाऊ गढवाल, पूर्व भारत तसेच पश्चिम घाटाचा ठाणे जिल्ह्य़ाच्या दक्षिणेकडील भाग, अशा सर्व क्षेत्रात ही फुलपाखरं हमखास असतात.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2016 रोजी प्रकाशित
फुलपाखरांच्या जगात : निसर्गाप्रमाणे बदलणारे ‘नाचरे’ फुलपाखरू
फुलपाखरांमध्ये काही फुलपाखरे अशी असतात की ज्यांचे रूप निसर्गातील बदलांप्रमाणे बदलते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 30-03-2016 at 07:22 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The butterfly effect and the environment