राजाजी ते रामनगर रस्ता रविवारपासून ७ मेपर्यंत बंद

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील कोपर उड्डाण पुलावर तुळई बसविण्याचे शेवटच्या टप्प्यातील काम येत्या रविवारपासून सुरू होणार आहे. या महत्त्वपूर्ण कामासाठी राजाजी रस्ता ते रामनगर रिक्षा वाहनतळापर्यंतचा (रामनगर पोलीस ठाणे) वर्दळीचा रस्ता येत्या ७ मेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी इच्छित स्थळी जाण्यासाठी वाहतूक विभागाने सुचविलेल्या पर्यायी मार्गाने प्रवास करावा, असे आवाहन डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी केले आहे.

कोपर उड्डाण पुलाचा राजाजी रस्त्यावरील उड्डाण पूल मे महिना अखेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या पुलावर एकूण २१ तुळया बसविण्यात येणार आहेत. यामधील बहुतांशी तुळ्या बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अखेरच्या टप्प्यातील सात तुळया बसविण्याचे काम शिल्लक आहे. या तुळया हैदराबाद येथून आणण्यात आल्या आहेत.

२ मे रात्री १२ वाजल्यापासून ते ७ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कोपर उड्डाण पुलालगतच्या राजाजी रस्त्यावरील पोहच रस्त्यावरील उड्डाण पुलावर तुळ्या बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. याशिवाय या रस्त्यालगतची इतर तांत्रिक, बांधकामविषयक कामे पूर्ण करायची आहेत. पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम पालिकेला पूर्ण करायचे आहे. त्यामुळे सलग सहा दिवसाचा बंद घेऊन एक टप्प्यात काम पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सहा दिवसाच्या कालावधीत राजाजी रस्ता, म्हात्रेनगर, आयरे भागातून येणारी वाहने राजाजी रस्ता मार्गावरील स्वामी नारायण मंदिर, जय श्रीराम रुग्णालय ते रामनगर पोलीस ठाणे या रस्त्यावरून नेण्यास वाहतूक विभागाने प्रतिबंध केला आहे. रेल्वे स्थानक, रामनगर रिक्षा वाहनतळ भागातील वाहने एस. व्ही. रस्त्यावरून वृंदावन हॉटेल मार्गे उजवीकडे वळण घेऊन बिर्याणी कॉर्नर येथून डावीकडे वळण घेऊन एस. के. पाटील शाळा चौकातून उजवीकडून स्वामी नारायण मंदिर येथून राजाजी रस्ता भागात जातील. राजाजी रस्ता, आयरेगाव, म्हात्रेनगर भागातून येणारी वाहने राजाजी रस्ता गल्ली क्रमांक एक येथून उजवे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील. या सहा दिवसांच्या कालावधीत पुलावर तुळया बसविण्याची यंत्रसामग्री राजाजी रस्ता भागात मोठय़ा संख्येने असणार आहे. त्यामुळे रिक्षाचालक, खासगी वाहनचालकांनी या भागात अधिक वर्दळ करू नये, असे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.

पोहच रस्त्यावरील उड्डाण पुलावर बसविण्यासाठी आणलेल्या तुळया.