डोंबिवलीच्या वेशीवरील पडले गावात वनसंपदा शाबूत; जंगलपट्टय़ात नागरिकांची नित्यनेमाने भेट

जागतिक वनदिन

अर्निबध वृक्षतोड आणि वेगाने वाढणारे नागरीकरण यामुळे शहरी भागात पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाला असला तरी काही प्रमाणात का होईना जंगलसंपदेने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. ठाणे महापालिकेच्या हद्दीतील; परंतु डोंबिवलीच्या वेशीवर असणाऱ्या पडले गावात असाच एक जंगलपट्टा शिल्लक असून सध्या या भागातील रहिवाशी सकाळ-संध्याकाळ नियमित हजेरी लावून वनविहाराचा आनंद घेत आहेत.

डोंबिवलीजवळील २७ गावांच्या हद्दीत पूर्वी बऱ्यापैकी जंगल होते. निळजे, भोपर आदी परिसरात अगदी मुंबईतूनही पर्यावरणप्रेमी पक्षी-निरीक्षण करण्यासाठी येत असत. मात्र हळूहळू ते नष्ट झाले. त्याजागी चाळी उभ्या राहिल्या. ठाणे महापालिका हद्दीत असणाऱ्या पडले गावात मात्र अजूनही जंगल पट्टा शाबूत असून तो संरक्षित करावा, अशी पर्यावरणप्रेमींची मागणी आहे. खाडीकिनारी असलेल्या या गावाच्या हद्दीत अनेक पाहुणे पक्षी नियमितपणे वास्तव्यास येतात.

इथे जंगल

कल्याण-डोंबिवलीतून ठाणे किंवा नवी मुंबईची बस पकडून पडले गावात जाता येते. खिडकाळी मंदिरचा थांबा गेल्यानंतर पुढील थांबा हा पडले गावाचा आहे. थांब्यावर उतरल्यानंतर रस्ता पार करून पडले गावात जाता येते. गावात प्रवेश करताना आजूबाजूला टोलेजंग इमारतींचे बांधकाम सुरू असलेले दिसते. त्यामुळे जंगल आहे कुठे असा प्रश्न पडतो. मात्र गावात आता गेल्यावर निसर्गाचे दर्शन घडते. गावात साधारण अर्धा एक किलोमीटर आत गेल्यानंतर घनदाट जंगल लागते. झाडांमधील पायवाटा आपल्याला जंगलाची सैर घडवितात. या पायवाटांवर सुक्या पानांचा खच पडलेला आहे. तो तुडवताना होणारा आवाज सुरुवातीला तुमची साथसंगत करतो. मात्र एकदा जंगलात शिरलात की भारद्वाज, कोकीळा, घार या पक्ष्यांचा आवाज झाडाझुडपांतून यायला लागतो. तसे तुमचे कान त्या दिशेला टवकारतात. जंगलात आंबा, चिंच, विविध रानफुले यांसह विविध झाडे आहेत. काही पाणथळ जागा आहेत. या ठिकाणी तुम्हाला किंगफिशरचे दर्शन घडते. सकाळी नऊच्या आधी तुम्ही जंगलात गेलात तर तुम्हाला झाडांच्या टोकावर पक्षी ऊन खात बसलेले दिसतील. त्यानंतर हे पक्षी अन्नाच्या शोधात पाणथळ जागी किंवा इतरत्र झाडांवर फिरताना दिसतील. जंगलातून थोडे पुढे गेले की तिवरांचा भाग लागतो. या तिवरांतून वाट काढीत खाडीकिनारी जाता येते. खाडीकिनारी स्पॉटेड मुनिया, रेड मुनिया, बदक, ग्लॉसी आयबीस आदी पक्ष्यांचे दर्शन घडते. खाडीकिनारी तिवरे शिल्लक आहेत. येथील झाडांची कत्तल केली जाते. मात्र खाडीकिनारी येणारे काही स्थलांतरित पक्षी हे झाडांच्या उंचावर आपली घरटी बांधतात. त्यांचा अधिवासच नष्ट होत चालल्याने या पक्ष्यांची संख्याही काही वर्षांनी कमी होईल अशी भीती निसर्गप्रेमी व्यक्त करतात. तसेच खाडीकिनारा स्वच्छ ठेवला गेला पाहिजे. प्रदूषणामुळे खाडीकिनारी पक्ष्यांना खाद्य मिळत नाही. यामुळेही येथे येणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमी होऊ शकते, तसेच  पक्ष्यांना खाद्य मिळेल.

आढळणारे पक्षी..

भारद्वाज, कोकीळा, घार, रेड मुनिया, स्पॉटेड मुनिया, हळद्या, ग्रे हॉर्न बिल, ग्रीन बीटर, पेंटेड स्टॉर्क, सनबर्ड, लहान निळा प्राईड किंगफिशर, सामान्य किंगफिशर, ग्रे हेरॉन, पर्पल हेरॉन, बुलबुल, ग्रेट वेंटेड, सॅन्ड पायपर, ग्लॉसी आयबीस, सफेद गालांची बुलबुल, सिग्नेचर कोळी,

काय काळजी घ्यावी?

जंगलात पक्षी निरीक्षणासाठी अनेक पक्षीप्रेमी येथे दररोज येत असतात. हिवाळा हा पक्ष्यांच्या विणीचा हंगाम असतो, तसेच येथे स्थलांतरित पक्षीही यादरम्यान येतात. पर्यटकांनी त्यांची वाहने या वेळी जंगलात आणू नयेत. वाहनांच्या आवाजामुळे व त्यातील धुराच्या प्रदूषणामुळे येथील निसर्गसंपदेवर व पक्ष्यांच्या वास्तव्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पक्षी-प्रेमींनी आपली वाहने गावामध्येच उभी करून आत जंगलात जावे. जंगलात आवाज न करता, शांततेत चालला तर विविध पक्ष्यांचे दर्शन तुम्हाला घडेल, वाहनांच्या आवाजाने पक्षी दूर उडून जातात त्यामुळे पक्षी दिसणार नाहीत. निसर्गाच्या सान्निध्यात छायाचित्र काढण्यासाठी काही हौशी माणसेही जंगलात येतात. त्यांचाही वावर येथे वाढत आहे. मात्र त्यांच्यासाठी एखादी वेगळी जागा निर्माण करता येईल.