उल्हासनगर: ठाणे जिल्ह्यात एमपीडीए नियमांच्या आधारे पहिली स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार विकास उर्फ पप्प्या शिंदे याला येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे. अवघ्या २२ वर्षाच्या या विकास शिंदे याच्यावर विविध पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल आहेत. तडीपार केल्यानंतरही विकास शिंदे या भागात येऊन गुन्हे करत होता. त्यामुळे उल्हासनगर पोलिसांनी त्याला स्थानबद्ध केले आहे.

गेल्या काही काळात उल्हासनगर परिमंडळ चार मध्ये गुन्हेगारी संदर्भात नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी एमपीडीए नियमानुसार उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिल्ह्यातील या वर्षातली पहिली स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांनी दिलेल्या माहितीनुसार विकास उर्फ पप्प्या शिंदे यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या या विकास शिंदे याच्यावर विविध पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल आहेत.

२०२२ या वर्षातही त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्याच्यावर तडीपारीची कारवाई केल्यानंतरही तो याच परिसरात येऊन गुन्हे करत होता. त्यामुळे त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव देण्यात आला होता. त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली. त्यानुसार विकास उर्फ पप्प्या शिंदे याला अटक करून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचप्रमाणे कुणी तडीपार असतानाही परिसरात दिसल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, अशी माहिती उल्हासनगर पोलिसांनी दिली आहे. एमपीडीए कायदा काय सांगतो एमपीडीए कायदा जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस आयुक्तांना एमपीडीए अंतर्गत तरतुदींचा वापर करून सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी हानिकारक कृती करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्याचा अधिकार देतो.