शहरातील जुनाट तसेच बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या इमारती दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे होणाऱ्या जीवित तसेच वित्तहानीच्या पाश्र्वभूमीवर यंदाच्या पावसाळय़ापूर्वी ठाणे महापालिकेने ठाणे,कळवा आणि मुंब्रा या तिन्ही शहरांतील तब्बल अडीच हजार इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, मान्सूनच्या अधिकृत आगमनाची तारीख काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही या इमारतींमधील रहिवाशांचे स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू न झाल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे. या अडीच हजार धोकादायक इमारतींपैकी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्याच इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (रचनात्मक परीक्षण) करण्यात आले असून दोन हजारांहून अधिक धोकादायक इमारतींमध्ये आजही रहिवाशांचे वास्तव्य आहे. विशेष म्हणजे, वर्ष उलटले तरी यांपैकी अनेक इमारतींचे नकाशे उपलब्ध होत नसल्याने इमारतींचा पाया किती खोलात आहे हे सांगणे कठीण आहे. ठाणे महापालिका दरवर्षी पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करते आणि त्याआधारे अशा इमारतींची सविस्तर आकडेवारी जाहीर करते. त्यानुसार यंदाही अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात ५८ इमारती अतिधोकादायक श्रेणीतील आहेत. तर एकंदर अडीच हजार इमारती राहण्यास धोकादायक ठरू शकतात. यापैकी काही इमारतींमध्ये रहिवाशांचे अजूनही वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार सुमारे २,५०० इमारती धोकादायक ठरल्या आहेत. गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी धोकादायक इमारतींचा आकडा सुमारे अडीच हजारांच्या घरात असल्याचे जाहीर केले होते. दरवर्षी पालिका पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक इमारती रिकाम्या करण्याची कारवाई करते. त्या तुलनेत महापालिका धोकादायक इमारती रिकाम्या करताना सहसा दिसून येत नाही. धोकादायक इमारतींमध्ये जीवमुठीत घेऊन राहाणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षिततेकरिता अशा स्वरूपाची यादी जाहीर करण्यात येत असली तरी ही प्रत्यक्षात मात्र कागदावरच राहत असल्याचे उघड झाले आहे.

मुंब्रा-दिवा आघाडीवर
ऐन पावसाळ्यात अनधिकृत इमारती कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या एकटय़ा मुंब्रा-दिवा भागांत २७ अतिधोकादायक तर सुमारे १४०० हून अधिक धोकादायक इमारती असल्याची माहिती ठाणे महापालिकेने नुकतीच जाहीर केलेल्या यादीतून पुढे आली आहे. मुंब्रा-दिवापाठोपाठ वागळे परिसरात ४३१ तर नौपाडा परिसरात २६९ धोकादायक इमारती असल्याचेही समोर आले आहे. उर्वरित प्रभागातील धोकादायक इमारतींचा आकडा शंभरीच्या जवळपास तसेच आतमध्ये आहे. विशेष म्हणजे, अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींच्या आकडेवारीमध्ये अन्य प्रभागांच्या तुलनेत मुंब्रा-दिवा आघाडीवर आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही या भागातील इमारती महापालिकेसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.