डोंबिवली जवळील २७ गाव हद्दीतील उंबार्ली गावाच्या परिसरात मानपाडा पोलिसांनी शनिवारी ४७ लाख ७६ रुपये किमतीचा २७२ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ओरिसा राज्यातून ही गांजाची तस्करी महाराष्ट्रात केली जाते, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांना उंबार्ली गाव हद्दीत गांजाची विक्री करण्यासाठी काही तस्कर येणार आहेत अशी गुप्त माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक अनिल भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने उंबार्ली भागात सापळा लावला. मिळालेल्या माहितीप्रमाणे एक मोटार कार उंबार्ली गाव हद्दीतील एका मोकळ्या जागेत येऊन थांबली. साध्या वेशातील पोलिसांनी मोटार कार जवळ जाऊन चालकाला माहिती विचारली. त्याला मोटार चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसाने इशारा करताच सापळा लावलेल्या पोलिसांनी मोटारीला घेरले. पोलिसांनी मोटारीसह दोघांना मानपाडा पोलीस ठाण्यात आले. मोटारीची तपासणी केली असता त्यात २७२ किलो तस्करीतून आणलेला गांजा पिशव्यांमध्ये भरला होता. मोहम्मद आतिफ हाफिज उल्लाह अन्सारी (३२, भिवंडी), सलाउद्दीन फारुख ठाकूर (२१, माझगाव, मुंबई) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अंमली पदार्थ तस्करी कायद्याने या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती साय्य्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी दिली. आरोपींकडून एकूण आठ मोबाईल, मोटार कार जप्त करण्यात आली आहे. आठ मोबाईलमधील संपर्क क्रमांक याची छाननी करून या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांच्या पथकाने सुरू केला आहे.