लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: महापालिका क्षेत्रातील विहिरींची साफसफाई दरवर्षी करूनही त्यातील पाण्याचा फारसा वापर होत नसल्याचे चित्र असतानाच, आता घोडबंदर भागातील ६७ विहिरी पुनरुजिवीत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कामांवर तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पुनरुजिवित झालेल्या विहिरींमधील पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी करण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात सुमारे ३५ तलाव आहेत. या तलावांमधील पाण्याचा वापर होताना दिसून येत नाही. त्याचबरोबर शहरात एकूण ५५५ विहिरी आहेत. त्यापैकी पालिकेच्या ३५० विहिरी आहेत तर, उर्वरित खासगी विहिरी आहे. पालिकेच्या ३५० विहिरींची प्रशासनाकडून दरवर्षी सफाई करण्यात येते. परंतु त्यातील पाण्याचा वापर होताना दिसून येत नाही. तसेच शहरात तलाव आणि विहिरी असे जलसाठे उपलब्ध असतानाही त्याचा वापर पाणी बंदच्या काळात होताना दिसून येत नाही. असे असतानाच, घोडबंदर भागातील ६७ विहिरी पुनरुजिवीत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कामांसाठी राज्य सरकारने ५० कोटी रुपयांचा निधी पालिकेला दिला आहे.

आणखी वाचा-ठाण्यात मनसे आणि भाजपात जुंपली, ठाण्यातील डोंगरीपाड्यातील पाणीटंचाई प्रकरण

उन्हाळ्यात किंवा पाणी बंदच्या काळात अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. अशा टंचाईग्रस्त भागांमध्ये विहिरीतील पाण्याचा पुरवठा करणे शक्य होईल. विहिरींमधील पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी होऊ शकतो. यामुळे टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळू शकतो. त्यासाठीच ६७ विहिरी पुनरुजिवीत करण्याचे काम हाती घेतले आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. विहिरींचे पुनरुजीवन केल्यानंतर त्यातून किती पाणी उपलब्ध होईल, याबाबत पालिकेकडे माहिती उपलब्ध नाही. तसेच दरवर्षी सफाई होणाऱ्या विहिरींचे पाणी वापरात येत नसतानाच, पुनरुजिवित केलेल्या विहिरींचे पाणी खरोखरच वापरात येणार का, हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

काय आहे प्रस्ताव

पुरुजिवित करण्यात येणाऱ्या ६७ विहिरींमधील पाणी उपसून गाळ काढणे. आडवे बोअर मारून पाण्याचे नैसर्गिक झरे उघडून जास्तीत जास्त पाणी मिळविणे. विहीरींची दुरुस्ती करणे. आसपासच्या नाल्यातील पाणी विहिरीत जाऊ नये यासाठी वॉटर प्रुफींग करणे. सांडपाणी विहिरीत जाऊन पाणी दुषित होऊ नये यासाठी विहीरींच्या सभोवतालच्या गटारी व नाल्यांची दुरुस्ती करणे. विहिरींवर लोखंडी जाळी बसविणे. विहिरींच्या तोंडावर ३ ते ४ मीटरपर्यंत आरसीसी बांधकाम करणे. विहिरींच्या कठड्याभोवती पेव्हर ब्लॉक बसवून परिसरच स्वच्छ ठेवणे. पाणी शुद्धीकरण यंत्र बसविण्यात येणार असून त्यात सैन्डफिल्ट्रेशन, कॉर्बनफिल्ट्रेशन, अल्ट्राफिल्ट्रेशन, युव्हीसिस्टमचा समावेश असणार आहे. शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा साठा करण्यासाठी आरसीसी टाकी बांधणे. वीज बचतीसाठी सौरउर्जा प्रकल्प राबविणे. अशी सर्व कामे करण्याचा प्रस्ताव आहे.

आणखी वाचा-मेट्रो कामादरम्यान हलगर्जीपणा, सळई थेट वाहनात आरपार शिरली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सद्यस्थितीत विहिरी पुनरुजिवीत करण्याची प्रकिया व्यवस्थित दिसून येत असली तरी ती केवळ कागदावर राहू नये. तसेच विहिरी पुनरुजीवनावर ५० कोटी रुपये इतका मोठा निधी खर्चुन होणार असून तो कशापद्धतीने होणार आहे, हे करदात्या ठाणेकरांसमोर येणे आवश्यक आहे. तसेच इतका खर्च केल्यानंतर त्यातून किती प्रमाणात वापरा योग्य पाणी उपलब्ध होणार आहे, हेही स्पष्ट होणे गरजेचे आहे. -रोहित जोशी, पर्यावरणप्रेमी