बदलापूर: अंबरनाथ तालुका क्रीडा संकुलाची बदलापुरात असलेल्या इमारतीची मंगळवारी मोठी पडझड झाली. इमारतीवरील छत कोसळले तर संकुलाच्या भिंतींना मोठ्या भेगा पडल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या क्रीडा संकुलाचे काही दिवसांपूर्वीच संरचनात्मक लेखापरीक्षण करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे हे लेखा परीक्षण करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरांच्या वेशीवर अंबरनाथ तालुक्याचे क्रीडा संकुल आहे. प्रशस्त मैदान आणि बंदिस्त क्रीडा संकुल असे हे संकुल सुमारे ८ एकर परिसरात पसरलेले आहे. दशक भरापूर्वी येथे बंदिस्त वस्तू उभारून त्यात टेबल टेनिस, बॅटमिटन, कॅरम असे बंदिस्त खेळ सुरू करण्यात आले होते. त्यामुळे तालुक्यातील तसेच अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील खेळाडूंना त्याचा फायदा होत होता. दररोज शहरातील अनेक खेळाडू या क्रीडा संकुलात खेळण्यासाठी येत असतात. मात्र मंगळवारी सायंकाळी अचानक या इमारतीच्या कार्मेल शाळेच्या बाजूने असलेल्या भिंतींना तडे गेले. त्यामुळे या वास्तूची पडझड झाली. वस्तूचे वरचे छप्पर कोसळून आतल्या भागात पडले. भिंतींना तडे गेल्याने खिडक्यांच्या काचा फुटल्या. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या इमारतीची पडझड झाली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. धक्कादायक म्हणजे काही दिवसांपूर्वीच या इमारतीचे संरचनात्मक लेखापरीक्षण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतरही पडझड झाल्याने या विभागाच्या लेखापरीक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.