लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: सहा महिन्यापूर्वी विठ्ठलवाडी येथील पेट्रोलपंपावर झालेल्या बाचाबाचीचा राग मनात धरुन शुक्रवारी संध्याकाळी कल्याण पूर्वेतील एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाची १० जणांच्या टोळीने खडेगोळवली भागातील मंगेशी मैदानात निर्घृण हत्या केली. या टोळीची कल्याण मध्ये खूप दहशत असल्याने नागरिक या टोळीच्या सदस्यांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यास घाबरतात. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मयत अल्पवयीन मुलगा आई, भावासह काटेमानिवली भागात राहतात. आई ठाण्यात रुग्ण काळजी वाहक, मोठा भाऊ नवी मुंबईत एका कंपनीत काम करतो. मयत मुलाचा मोठा भाऊ आदित्य लोखंडे यांनी लहान भावाच्या हत्यप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. एका अल्पवयीन मुलीची एका तरुणाने हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच ही घटना घडल्याने कल्याण पूर्वेत कायदा सुव्यवस्था आहे की नाही, असे प्रश्न नागरिक करत आहेत.

हेही वाचा… ननावरे दाम्पत्य आत्महत्येप्रकरणी आमदार बालाजी किणीकर यांच्या पीएसह चारजण अटकेत

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार आदित्य लोखंडेचा अल्पवयीन भाऊ, त्याचे दोन मित्र शुक्रवारी संध्याकाळी काटेमानिवली भागातून पायी चालले होते. त्यावेळी कुख्यात गुंड आकाश जैसवाल, त्याचा साथीदार दुचाकीवरुन मयत मुलाच्या समोर आले. गुंड आकाशने मयत मुलाला ‘काय रे माझा मित्र नीरज दासला चाकूचा धाक दाखवून त्याची दुचाकी घेऊन तू पळून गेला होता. आता तुला मी सोडणार नाही.’ अशी धमकी दिली. मयत मुलाने आपण कधीही कोणाला धमकी वगैरे दिली नाही, असे सांगितले.

हेही वाचा… कडोंमपा विद्युत विभागाच्या कामासाठी सखाराम कॉम्पलेक्स मधील रस्ता आजपासून बंद

आज तुला सोडणार नाही. माझी कोळसेवाडी पोलीस ठाणे, राजकीय मंडळींमध्ये ओळख आहे. मला कोणी काही करणार नाही, असे बोलून गुंड आकाश निघून गेला. त्यानंतर काही वेळात आकाश व त्याचे नऊ साथीदार पुन्हा मयत मुलगा व त्याच्या साथीदारांचा पाठलाग करत कैलासनगरमध्ये आले. त्यांनी मयत मुलाला खेचत खडेगोळवली भागातील मंगेशी मैदान येथे नेले. तेथे मयत मुलाला लोखंडी सळई, दांडके, धारदार शस्त्रांनी १० जणांनी बेदम मारहाण करुन बेशुध्द केले. अल्पवयीन मुलाच्या साथीदारांना टोळक्याने मध्ये पडला तर ठार करण्याची धमकी दिली.

टोळके मयत मुलाला मारुन पळून गेल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. डाॅक्टरांनी त्याला शीवच्या लोकमान्य रुग्णालयात नेण्याची सूचना केली. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे अल्पवयीन मुलाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कुख्यात गुंड आकाश जैसवाल, नीकेश चव्हाण, नीरज दास, राम कनोजिया, राजा पंडित, सोनू अरबाज, जतीन तिवारी, प्रेम गुंड्या, मुकेश व इतर दोन अशी मारेकऱ्यांची नावे आहेत.

हेही वाचा… टिटवाळा लोकलमध्ये अज्ञाताने घाण केल्याने लोकल डबा रिकामा

मार्चमध्ये मयत मुलगा व त्याचा साथीदार विठ्ठलवाडी येथे पेट्रोलपंपावर दुचाकीत पेट्रोल भरत होते. त्यावेळी गुंड आकाशने मयत मुलाला तुझे वाहन बाजुला घे अशी धमकी दिली होती. ते बाजूला न घेतल्याचा राग आकाशच्या मनात होता. आकाशची कल्याण पूर्व भागात दहशत असल्याने त्यावेळी मयत मुलाने त्याच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली नव्हती. या टोळी विरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मयत मुलावर यापूर्वी मोक्काअंतर्गत कारवाई झाली होती. तेथून सुटल्यावर त्याने पुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत दोन गुन्हे केले होते, असे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले.