कल्याण पश्चिमेतील मोहने येथील रिक्षा वाहन तळांवर तीन जणांच्या टोळक्याने एका रिक्षा चालकाला किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण केली. या रिक्षा चालकाला मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विकी बाळाराम पाटील (३०, रा. जरी मंदिर, वडवली, आंबिवली, कल्याण) असे तक्रारदार रिक्षा चालकाचे नाव आहे. किरण दादा पवार (२७), सुनील अनिल कांबळे (२५), प्रदीप दादा पवार (२२, सर्व राहणार लहुजी नगर, मोहने) अशी आरोपींची नावे आहेत. रविवारी दुपारी रिक्षा चालक विकी पाटील मोहने येथील रिक्षा वाहनतळावर प्रवासी वाहतूक करत होते. प्रवासी रिक्षेत बसत असताना किरण पवार तेथून दुचाकी वरुन वेगाने जात होता. या दुचाकीचा धक्का रिक्षा किंवा प्रवाशाला लागला असता तर अपघात झाला असता, असे म्हणत रिक्षा चालक विकी यांचे काका गोरख एकनाथ पाटील यांनी किरण पवार याला थांबवून ‘ही काय दुचाकी चालविण्याची पध्दत आहे का’, असा प्रश्न केला. त्याचा राग आरोपी किरण याला आला. त्याने एकनाथ यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यावेळी किरणचे साथीदार आरोपी सुनील, प्रदीप पोहचले. त्यांनी एकनाथ यांच्याशी वाद घातला. भांडण वाढत असल्याने रिक्षा चालक विकी यांनी मध्यस्थी करुन आरोपींना काका एकनाथ यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपींनी रिक्षा चालक विकी पाटील याला ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचा हात आरोपींनी पिरगळल्याने त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विकी पाटील यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरुध्द मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. दुचाकी स्वारांकडून रिक्षा चालकांना किरकोळ काऱणांवरुन बेदम मारहाण करण्याचे प्रकार वाढल्याने रिक्षा चालक नाराजी व्यक्त करत आहेत. बहुतांशी दुचाकी चालकांकडे दुचाकी चालविण्याचा परवाना नसतो. आपल्या नातेवाईकाची दुचाकी घेऊन बहुतांशी तरुण मौजमजेसाठी दुचाकीवरुन महाविद्यालय, शाळा परिसरात भटकंती करत असतात, अशा तक्रारी आहेत.