ठाणे : लाडक्या बहिणींच्या ई केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करण्याची मुदत आहे तसेच पूरग्रस्त भागासाठी आणखी पंधरा दिवस मुदत वाढवून घेणार असे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लाडक्या बहिणींच्या ई केवायसीसाठी सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत. दररोज जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींची ई केवायसी प्रक्रिया होत आहे.
आत्तापर्यंत अंदाजे एक कोटी दहा लाखांपेक्षा जास्त महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून अडीच लाखांपेक्षा अधिक महिलांची ९० % प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महिलांना अद्यापही प्रक्रियेसाठी नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे. पुरग्रस्त भागात महिलांसाठी आणखी पंधरा दिवसांचा कालावधी वाढवून घेणार आहोत असे तटकरे यांनी स्पष्ट केले. तसेच ठाणे महापालिकेत महापौर ठरविताना राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहील त्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे तटकरे म्हणाल्या.