Marathi Language Week / ठाणे – मराठी भाषेला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अभिजात भाषेचा दर्जा मिळला. या निर्णयास अवघे एक वर्ष पूर्ण होत आहे. या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने अभिजात मराठी भाषा दिन आणि शुक्रवार, ३ ऑक्टोबर ते गुरूवार, ९ ऑक्टोबर या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने नवी मुंबई महापालिकेत देखिल विविध सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
मागील वर्षी ३ ऑक्टोबरला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. भाषेचा प्रसार, प्रचार आणि संवर्धनासाठी हा निर्णय महत्वाचा मानला जातो. यंदा या निर्णयास एक वर्ष पुर्ण होत आहे. यानिमित्त सर्वत्र उत्सव साजरा केला जाणार आहे. याच अंतर्गत नवी मुंबई महापालिकेने देखील सप्ताह आयोजित केला आहे.
या सप्ताहाची सुरुवात शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी साहित्यिक तथा व्याख्याते, साहित्य अकादमी (नवी दिल्ली) चे शासकीय सदस्य प्रा. नरेंद्र पाठक यांच्या ‘अभिजात मराठी – अभिमान मराठी’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे. हे व्याख्यान सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्र येथे होणार आहे.
तर, मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी लेखक, गझलकार जनार्दन म्हात्रे हे ‘अभिजात मराठीचे शुद्धलेखन’ या विषयावर सादरीकरण करणार असून शुद्धलेखनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी मराठी भाषा आणि साहित्य यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहे. यात महापालिका अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांना सहभागी होता येणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहेत.
अभिजात मराठी कवितेची समृद्ध परंपरा पुढे नेण्यासाठी गुरूवार, ९ ऑक्टोबर रोजी काव्यवाचन स्पर्धा होणार आहे. या उपक्रमात स्पर्धकांनी स्वतःचे नव्हे तर नामवंत कवींच्या कवितांचे पाच मिनिटांच्या कालावधीत सादरीकरण करता येणार आहे. ही स्पर्धा देखील सकाळी ११ वाजता पार पडणार आहे.
नाव नोंदणी अनिवार्य
अभिजात मराठी भाषा सप्ताहातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी ६ ऑक्टोबरपर्यंत ९९२०३७८५७४, ९९३००२०८१४ या क्रमांकावर नावनोंदणी करणे अनिवार्य असणार आहे.
प्रतिक्रिया
‘मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा गौरव करण्यासाठी आयोजित या अभिनव उपक्रमांत केवळ अधिकारी-कर्मचारीच नव्हे तर शिक्षक आणि मराठी भाषाप्रेमी नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. प्रश्नमंजुषा आणि काव्यवाचन स्पर्धा या दोन्ही उपक्रमांत प्रवेश विनामूल्य असून यात स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.