ठाणे : ठाणे येथील कळवा खाडी किनारी भागातील खारफुटी क्षेत्रात बेकायदा बांधण्यात आलेल्या ५७ झोपड्यांवर ठाणे महापालिकेने सोमवारी पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. स्थानिक रहिवाशांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पालिकेने त्याला न जुमानता झोपड्या पाडण्याची कारवाई केली.

कळवा येथील खाडी किनारी भागातील खारफुटींवर हजारो झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. या झोपड्यांसंदर्भात कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये खाडी किनारी भागातील खारफुटीची कत्तल करून उभ्या राहिलेल्या झोपड्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानंतर कारवाईच्या नियोजनासाठी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीतील नियोजनानुसार सोमवारी सकाळी ठाणे जिल्हा प्रशासन आणि ठाणे महापालिका यांनी संयुक्तपणे झोपड्या पाडण्याची कारवाई सुरु केली. या कारवाईदरम्यान तहसील विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारीही उपस्थित होते. जुन्या ब्रिटिश कालीन कळवा उड्डाण पुलाच्या खाली, पोलीस आयुक्तालयाच्या समोर असलेल्या खाडीपात्रात ही कारवाई करण्यात आली. सायंकाळी उशीरापर्यंत येथील ५७ झोपड्यांवर कारवाई करण्यात आली होती. कारवाई सुरू असताना येथील स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शवला होता.