ठाणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालक दंडाची रक्कम भरत नसतात. ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीच्या नोटीसानंतर ६६ लाख ७ हजार ९ रुपयांचा थकित दंड वाहतुक विभागाकडे भरण्यात आला आहे. सर्वाधिक दंडाची रक्कम ठाणे ते दिवा येथील वाहन चालकांनी भरली असून ही रक्कम २९ लाख ४३ हजार १५० रुपये इतकी आहे.

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रात वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ठाणे वाहतुक पोलिसांकडून ई-चलान यंत्राद्वारे कारवाई केली जाते. यामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यानंतर परिसरातील वाहतुक पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी संबंधित चालकांच्या वाहनाचे छायाचित्र काढतात. त्यानंतर वाहन चालकाला नियमाचे उल्लंघन केल्याच्या दंडाची माहिती मोबाईल क्रमांकावर प्राप्त होते. वाहन चालक या दंडाची रक्कम भरण्यास अनेकदा टाळाटाळ करत असतात. त्यामुळे वाहन चालकांवर थकित दंडाची रक्कम वाढत जाते. पोलिसांकडून वाहन चालकांविरोधात कारवाई करताना त्याच्या यापूर्वीच्या दंडाच्या रकमेचीही वसूली केली जाते. पंरतु ही रक्कम अनेकदा चालक भरत नाहीत.

हेही वाचा…कल्याण मुरबाड प्रवासी वाहतूक करणाऱ्या अवैध जीपवर ‘आरटीओ’ची कारवाई

मागील वर्षभरापासून अशा थकित दंडाची रक्कम मोठ्याप्रमाणात वाढली आहे. ठाणे वाहतुक पोलिसांनी लोक अदालतीमध्ये अशी प्ररकरणे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये वाहन चालकाला लोक अदालतीची नोटीस येतात. त्यानंतर चालक थकित दंडाची रक्कम भरण्यासाठी वाहतुक पोलिसांकडे गेल्यास त्याला दंडाच्या रकमेमध्ये सवलत दिली जाते. त्यानुसार, मागील दीड महिन्यांत अनेक वाहन चालकांनी लोक अदालतीच्या नोटीसनंतर ठाणे वाहतुक पोलिसांकडे धाव घेतली. या वाहन चालकांकडून ठाणे पोलिसांनी दंड भरला. तर काही वाहन चालकांनी १४ डिसेंबरला लोक अदालतीमध्ये दंडाची रक्कम भरली. या लोक अदालतीमध्ये ८ हजार ३११ खटल्यांच्या प्रकरणांमध्ये ६६ लाख ७ हजार ९ रुपयांचा दंड वाहन चालकांना भरल्याची माहिती ठाणे वाहतुक पोलिसांनी दिली.

हेही वाचा…भिवंडीत बांगलादेशींना अटक

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात वाहतुक विभागाचे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या भागात एकूण १८ कक्ष आहेत. यातील ठाणे शहरात ठाणेनगर, नौपाडा, कळवा, मुंब्रा, कोपरी, वागळे, कापुरबावडी, कासारवडवली या कक्षाचा सामावेश आहे. भिवंडी शहरात भिवंडी, नारपोली, कोनगाव कक्षाचा, कल्याणमध्ये कल्याण, डोंबिवली, कोळसेवाडी या कक्षांचा तर उल्हासनगर युनीटमध्ये विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ कक्षांचा सामावेश आहे. यामध्ये सर्वाधिक दंडाची रक्कम ठाणे शहरात भरण्यात आली आहे.

कारवाई भरलेल्या दंडाची रक्कम

ठाणे ते दिवा – २९ लाख ४३ हजार १५०

कल्याण- डोंबिवली- १८ लाख ४७ हजार २५९

भिवंडी – १३ लाख ०५ हजार ८५०

उल्हासनगर ते बदलापूर – ५ लाख १० हजार ७५०

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूण : ६६ लाख ७ हजार ९ रुपये