सर्वसामान्य लोकल वातानुकुलित लोकलमध्ये बदलून वातानुकुलीत लोकलच्या फेऱ्या सुरू केल्या जात असल्याने सर्वसामान्य प्रवाशांमध्ये संताप आहे. याविरूद्ध मुंब्रा आणि ठाणे स्थानकात प्रवाशांचे आंदोलन झाल्यानंतर सोमवारी बदलापूर स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल्वे स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयाबाहेर गर्दी जमवून घोषणाबाजी केली. वातानुकूलित लोकल बंद करण्याची मागणी यावेळी प्रवाशांनी केली. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ५ वाजून २२ मिनीटांनी सुटणारी बदलापूर लोकल वातानुकुलित केल्याने सर्व प्रवाशांचा भार त्यानंतर असलेल्या ५ वाजून ३३ मिनिटांच्या खोपोली लोकलवर आल्याने प्रवाशांना आज गर्दीत प्रवास करावा लागला. त्यानंतर संतप्त प्रवाशांनी सोमवारी संताप व्यक्त केला.

हेही वाचा – कचरा कल्याण-डोंबिवलीत , फोन मात्र लातुरला

वातानुकुलित लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य लोकलचा दर्जा बदलून त्यांना वातानुकुलीत लोकलमध्ये बदलले जाते आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकलची संख्या कमी होत आहे. कोणतीही नवी लोकल सुरू न करता सर्वसामान्य लोकल वातानुकुलीत मध्ये बदलली जात असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना त्यातून प्रवास करता येत नाही. काही दिवसांपूर्वी मुंब्रा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आंदोलन करत रेल्वे रोको केला होता. त्यांनतर ठाण्यातही अशाच प्रकारे प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर सोमवारी बदलापूर रेल्वे स्थानकात सायंकाळी सातच्या सुमारास प्रवाशांनी स्थानक प्रबंधकांच्या कार्यालयाबाहेर गोळा होत रेल्वे पोलिसांच्या कारभाराचा संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी सुटणारी बदलापूर लोकल वातानुकूलितध्ये बदलण्यात आली. त्यामुळे त्यानंतर असलेल्या ५ वाजून ३३ मिनीटांच्या खोपोली लोकलवर गर्दी वाढली. सोमवारी प्रवाशांना खोपोली लोकलमधून खच्चून भरलेल्या गर्दीतून प्रवास करावा लागला. त्यामुळे बदलापूर स्थानकात लोकल आल्यानंतर प्रवाशांनी थेट स्थानक व्यवस्थापकांचे कार्यालय गाठत कारभारावर संताप व्यक्त केला. यावेळी प्रवाशांनी वातानुकूलित लोकल बंद करा अशी आग्रही मागणी केली. यानंतर काही काळ स्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.