लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: हवामान विभागातर्फे मुंबईसह ठाणे जिल्ह्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील इयत्ता बारावी पर्यंतच्या सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या, गुरुवार २० जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ठाणे जिल्ह्यात मंगळवार रात्रीपासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे बुधवारी सकाळी उपनगरीय गाड्यांची वाहतूक सेवाही काही तास ठप्प झाली होती. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. तसेच बुधवारी दुपार नंतर पावसाने अधिक जोर धरल्याने विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती.

हेही वाचा… कल्याण-डोंबिवली वास्तुविशारद संस्थेच्या अध्यक्षपदी केशव चिकोडी

याचबरोबर हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यात उद्या, गुरुवार २० जुलै रोजी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. तसेच भरतीची वेळ विचारात घेऊन जिल्ह्यातील सर्व इयत्ता बारावी पर्यंतच्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व खासगी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर अशा परिस्थितीतही शाळा भरविल्यास काही घटना घडल्यास त्यास ते शाळा आणि महाविद्यालय व्यवस्थापन जबाबदार असतील असेही जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी यांचाही आढावा घेण्यात आला. ज्या शाळांची इमारत मोडकळीस आलेली असेल तेथील वर्ग तातडीने थांबवून सुस्थितीतील इमारतीत हलविण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.