शिवसेनेची स्थानिक पातळीवरील बहुमताची जुळवणी व्यर्थ
कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपसोबत युती करून सत्तास्थापन करणाऱ्या शिवसेनेने महापौर निवडणुकीस ४८ तास शिल्लक असताना कोकण आयुक्तांकडे चार अपक्षांसह ५६ नगरसेवकांचा गट स्थापन करून भाजपला एक प्रकारे इशाराच दिल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. या चार अपक्षांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील सहा नगरसेवकांचाही पाठिंबा मिळविण्यात शिवसेनेचे नेते यशस्वी झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. बहुमत मिळविण्यासाठी भाजपसोबत सुरू झालेल्या सत्तास्पर्धेत शिवसेनेने ६२ नगरसेवकांचे गणित जमवूनही ऐनवेळेस मुंबईतील नेत्यांनी युतीची घोषणा केल्याने स्थानिक नेते हिरमुसले आहेत. यानंतर काँग्रेसच्या चार नगरसेवकांच्या पाठिंब्याचे पत्र मागे घेण्यात आल्याचेही वृत्त आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक करून झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठीही शिवसेना-भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १० नगरसेवकांचा पाठिंबा मिळवून शिवसेनेला धक्का द्यायची गणिते भाजपने आखली होती. हे लक्षात आल्याने निकाल हाती येऊ लागताच शिवसेनेचे ठाणे जिल्ह्य़ातील नेते ‘कामाला’ लागले होते. बहुमतासाठी ६१ नगरसेवकांचा आकडा आवश्यक असताना कोकण आयुक्तांकडे शिवसेनेने चार अपक्षांसह ५६ नगरसेवकांचा गट स्थापन केल्याने भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपला आपली ताकद दाखवून द्यायची या ईर्षेने पेटलेले सेना नेते चार अपक्षांना गळाला लावण्यात यशस्वी झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
महापौर निवडणुकीदरम्यान शिवसेनेने या चार अपक्षांना आपल्या सोबत घेऊन सभागृहात शिवसेनेचे बहुमत असल्याचे भाजपला दाखवून दिले. प्रसंगी भाजपने रुसवेफुगवे करण्यास सुरुवात केली तर तुमच्या पाठिंब्याची गरज नाही इथपर्यंत ठणकावून सांगण्यास शिवसेना नेते मागेपुढे पाहणार नाहीत, असे वातावरण तयार करण्यात सेना नेते यशस्वी झाले आहेत. शिवसेनेची ही खेळी पाहून भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचे समजते. ५६ नगरसेवकांचे गणित जमविताना काँग्रेसचे चार आणि राष्ट्रवादीचे दोन अशा सहा नगरसेवकांच्या पाठिंब्याचे पत्रही शिवसेनेने मिळवले होते. या दोन्ही पक्षांनी कोकण आयुक्तांकडे स्वतंत्र गट स्थापन केले आहेत. या गटांचा पाठिंबा मिळविण्यात शिवसेना नेते यशस्वी ठरले होते, मात्र मुंबईत ऐनवेळेस युतीचे गणित जमताच हे पत्र मागे घेण्यात आले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
अपक्षांची गणिते..
विशेष म्हणजे, कल्याण येथील सिद्धेश्वर आळीमधील अपक्ष उमेदवार कासीफ इमाम मोहम्मद तानकी यांचा पाठिंबाही शिवसेनेने मिळविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अन्य तीन अपक्ष नगरसेवकांमध्ये रिपब्लिकन पक्षातून निवडून आलेल्या गाळेगाव प्रभागातील माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड यांच्या पत्नी शीतल गायकवाड यांचा समावेश आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक व निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते अनिल गीध यांनीही शिवसेनेच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून २७ गावांमधील आडिवली-ढोकळी प्रभागातून निवडून आलेले अपक्ष कुणाल पाटील यांनीही शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. ठाण्यातील राष्ट्रवादीतील एका बडय़ा नेत्याचे ते नातेवाईक आहेत.
कॉंग्रेसचा पाठिंबा..
काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करून शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र दिले होते हे खरे आहे, अशी कबुली कल्याणमधील एका वरिष्ठ काँग्रेस पदाधिकाऱ्याने ठाणे लोकसत्ताला नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. युती जाहीर होताच या पाठिंब्याला काही अर्थ राहिला नाही. त्यामुळे पत्र कोकण आयुक्तांकडे सादर केले जाऊ नये, अशी भूमिका आम्ही मांडली आणि शिवसेनेने ती तत्काळ मान्य केली, असेही या नेत्याने स्पष्ट केले. आमचे सत्तेचे गणित जमले होते, मात्र वरिष्ठांचे आदेश शिरसावंद्य, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Nov 2015 रोजी प्रकाशित
वरिष्ठांच्या आदेशामुळेच भाजपशी युती!
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक करून झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठीही शिवसेना-भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली होती. म
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 14-11-2015 at 07:47 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alliance with bjp by seniors orders