बदलापूर: बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या विविध कामांचा प्रवाशांना फायदा कधी होईल याबाबत कल्पना नाही. मात्र सध्या वाढत्या पाऱ्यामुळे प्रवाशांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. फलाट क्रमांक एकवर फक्त दोन ठिकाणी अपुरे छप्पर आहे. तर होम प्लॅटफॉर्मवर ज्या भागात लोकल थांबत नाही तिथे छप्पर आहे. परिणामी उन्हाच्या झळा आणि चटके सहन करतच प्रवाशांना लोकल पकडावी लागते आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संपाताचे वातावरण आहे.

बदलापूर रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांपैकी एक स्थानक आहे. बहुतांश शासकीय कर्मचारी, कामगार, मुंबई आणि उपनगरात कार्यरत खासगी कर्मचारी, पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी बदलापुरात राहतात. त्यामुळे शहरातून दररोज लाखो प्रवाशी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. यातील बदलापूर स्थानकातून सुटणाऱ्या सर्वाधिक लोकल गाड्या फलाट क्रमांक एक वरून सुटतात. सध्या फलाट क्रमांक एकवर पादचारी पूल, स्वयंचलित जिने आणि लिफ्ट उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी दोन ठिकाणी खोदकाम करून फलाटाचा मोठा भाग व्यापला गेला आहे. तर फलाट क्रमांक एकच्या समोरच्या बाजुला होम प्लॅटफॉर्मचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी संरक्षक भिंती आणि फलाट छप्पराच्या उभारणीचे काम सुरू आहे. ते मुदत संपूनही पूर्ण होऊ शकलेले नाही. फलाट क्रमांक एकवर दोन ठिकाणी सध्या छप्पर अस्तित्वात आहे. मात्र फलाटाचा मोठा भाग छप्पराविना आहे. त्यामुळे येथून कर्जत, खोपोली आणि मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उन्हात उभे राहून लोकलची वाट पाहावी लागते आहे. तर होम प्लॅटफॉर्मवर कल्याण दिशेला ज्या भागात लोकल उभी राहत नाही त्या भागात छप्पर आहे. कर्जतच्या दिशेला छोटे छप्पर आहे. दरम्यानच्या मोठ्या भागात छप्पर नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके आणि झळ सोसत लोकल पकडावी लागते आहे.

हेही वाचा… शहापूरजवळ कलाकारांसाठी वृध्दाश्रम उभारण्याच्या हालचाली; भिवंडी, शहापूर भागात जमिनीची चाचपणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसापासून सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाचा पारा वाढत असल्याचे दिसून आले आहे. अशावेळी प्रवाशांना कडक उन्हात उभे राहूनच लोकलची वाट पाहावी लागते आहे. त्यामुळे प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे. छप्पर बसवण्यासाठी आणखी किती काळ वाट पाहावी लागणार याबाबत माहिती नाही. त्यामुळे येत्या काळात छप्पराचे काम वेळेत न झाल्यास प्रवाशांना स्थानकात उन्हापासून वाचण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.