ठाणे : महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या नावाने अधिकारी, नगरसेवक आणि नागरिकांना कॉल करून तसेच संदेश पाठवून पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आयुक्तांच्याच नावाने गंडा घालण्याचा प्रकार सुरू असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन आयुक्त शर्मा यांनी केले आहे.

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या नावाने ८१६७२ ८३९१० या बोगस संपर्क क्रमांकावरून अधिकारी, नगरसेवक आणि नागरिकांना संपर्क करण्यात येत आहे. कॉल करण्याबरोबरच संदेश पाठविले जात आहेत. त्यात पैशाची मागणी देखील करण्यात येत आहे. या क्रमांकाचे व्हाट्सएप खाते देखील उघडण्यात आले असून त्यावर महापालिका आयुक्तांचा फोटो लावण्यात आला आहे. या क्रमांकावरून काही पैशाची मागणी देखील करण्यात येत आहे. भामटे थेट आयुक्तांच्याच नावाने गंडा घालत असल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची आयुक्त शर्मा यांनी गंभिर दखल घेतली असून त्यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा क्रमांक बोगस असल्याचे स्पष्ट करत या क्रमांकास प्रतिसाद न देता कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.