ठाणे – नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन आज बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास अवघे काही तास बाकी आहेत. या कार्यक्रमासाठी अनेक राजकीय नेत्यांसोबतच सुमारे २५ हजार नागरिक आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच नवी मुंबई विमानतळावर डिसेंबरपासून विमानसेवा सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. नवी मुंबई शहराच्या विकासात अधिक भर घालणाऱ्या या विमानतळामुळे अनेक रोजागाराच्या संधी प्राप्त होणार असून यात स्थानिक ग्रामस्थांना किती प्रमाणात संधी असणार हे दि बां पाटिल यांच्या चिरंजीव अतुल पाटिल यांनी स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई विमानतळ हे ११६० हेक्टर जमिनीवर उभारलेले गेले आहे. या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उद्घाटन सोहळा आज, बुधवारी काही तासातच पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या विमानतळासाठी उभारणी साठी उलवे सह १० गावांमधील ग्रामस्थांनी आपली शेती, घर, आणि गावे दिली आहेत. सिडकोने २००७ ते २०१४ दरम्यान शेतकऱ्यांसोबत नुकसानभरपाईच्या पॅकेजचा करार केला होता. या करारानुसार प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या संपादित जमिनीच्या बदल्यात १२.५ टक्के विकसित भूखंड आणि अतिरिक्त १० टक्के जमीन म्हणजे एकूण २२.५ टक्के विकसित जमीन देण्यात आली.

तसेच प्रत्येकी १० रुपये किमतीचे १०० समभाग, पुनर्वसन क्षेत्रात घर बांधण्यासाठी १५०० रुपये प्रति चौरस फूट दराने बांधकाम खर्च, स्थलांतरासाठी ५० हजार रुपये वाहतूक भत्ता आणि जीवनावश्यक गरजांसाठी ३६ हजार रुपयांचा भत्ता देण्यात आला. धार्मिक भावना जपण्यासाठी प्रत्येक गावातील मंदिरांसाठी एक कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. या पुनर्वसनामुळे काही ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला तर अनेकांनी गावातील एकत्र राहण्याची मज्जा वेगळी आहे असे संमिश्र मत व्यक्त केले होते. असे असले तरी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिकांना नोकरीची संधी असणार का या बाबत दि बा पाटिल यांचे सुपूत्र पाठपुरावा करत असल्याचे दिसून आले.

काय म्हणाले दिबांचे सुपूत्र अतुल पाटिल

सरकारकडे स्थानिकांच्या रोजगारासंबंधी शब्द टाकलेला आहे. एक गोष्ट कबूल करायलाच लागेल की जे ट्रेनिंग द्यायला हवं होतं, जी जबाबदारी सिडकोची होती ते ट्रेनिंग दिलं गेलेलं नाही. ज्या विशिष्ट रोजगाराला ट्रेनिंगची गरज नाही म्हणजे साफसफाई, हाऊसकिपिंग किंवा इतर जी छोटी काम आहेत, ती स्थानिकांना देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणजे विमानतळावरील रोजगारासाठी प्रकल्पग्रतांमधून माणसे भरली जावी. जवळजवळ ७५० ते ८०० लोकांचे ट्रेनिंग आधीच झालेले आहे. यामध्ये हाऊस कीपिंग आणि या साफसफाईच्या कामावर घेण्याची प्रक्रिया चालू आहे. परंतु जे तांत्रिक काम असते त्या बाबतीत थोडाश्या समस्या येऊ शकतात. ही भरती करणारी ओसीएसजी कंपनी आहे.

\त्यांच्या अधिकाऱ्यांसोबतही रोज माझे बोलणे चालू आहे. काही लोकांचा इंटरव्यू घेऊन त्यांना नोकरीला लावण्याचे प्रयत्न चालू आहेत. जेवढे तांत्रिक किंवा ऑफिस याच्यातली जी लोक आहेत ती जास्तीत जास्त स्थानिक लोक भरण्याचा प्रयत्न करत आहोत, करणार आहोत. यासाठी मी स्वतः सिडकोशी, संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी, नायडू, मोहोळ यांच्याशी  मी हक्काने बोलून त्यांना आग्रहाची विनंती करणार आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो अगदी शंभर टक्के नाही पण कमीत कमी ५० % लोक तरी या तांत्रिक कॅटेगरीमध्ये सुद्धा आपली लोक तिथे आत मध्ये जातील. त्यांना नोकरी मिळेल.

ज्या अनुभवी माणसे या गाईडलाईन्स आहेत त्या सिडको, अदानींनी किंवा नवी मुंबई विमानतळासाठी तयार केलेल्या नाही आहेत. या सर्व गाईडलाईन्स डीजीसीएने दिलेल्या आहेत. या सर्व एका पेपर वर क्लिअर असून एकाही गाईडलाईन्सला ते बायपास करू शकत नाही. कारण, काही महिन्यांपुर्वी जो विमान अपघात झाला, विमान कोसळले आणि प्रवासी तसेच नागरिकांचा मृत्यु झाला त्यामुळे या गाईडलाईन्स अधिक कडक करण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांच्या नियम, पॉलिसीज, क्रायटेरिया व्यतिरिक्त नोकरी देण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आलेल आहे. त्यामुळे थोडीशी अडचण येते. तरी देखील ओसीएस कंपनीमार्फत जी भरती होणार आहे तिथे मी जास्तीत जास्त प्रयत्न करून आपल्या जास्तीत जास्त लोकांना नोकरीला लावण्याचा प्रयत्न करणार आहे.