चार प्रवाशांच्या भाडय़ाची दोघांकडून वसुली

ठाणे/डोंबिवली/बदलापूर : राज्य शासनाने टाळेबंदी शिथिलीकरणानंतर रिक्षा प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली असली तरी करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून एका रिक्षातून एका वेळी दोनच प्रवाशांची वाहतूक करण्याची अट घातली आहे. यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात यापूर्वी चार प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या शेअर रिक्षाचालकांना केवळ दोन प्रवाशांची वाहतूक करावी लागत असून हा आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी रिक्षाचालक आता प्रवाशांकडून दुप्पट भाडे आकारत आहेत. यामुळे चार प्रवाशांचा भार दोन प्रवाशांवर टाकला जात असून या प्रकाराबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेली टाळेबंदी शिथिल करत राज्य शासनाने दुकाने आणि खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीसाठी रिक्षा वाहतुकीसही परवानगी दिली आहे. यामुळे गेल्या तीन महिन्यांनंतर रिक्षा वाहतूक सुरू झाल्याने चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून एका रिक्षातून एका वेळी दोनच प्रवाशांची वाहतूक करण्याची अट घातली आहे. मात्र, या अटीमुळे शेअर रिक्षातून चारऐवजी केवळ दोन प्रवाशांची वाहतूक करावी लागत असून यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे रिक्षाचालकांकडून सांगण्यात आले. हा आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून दुप्पट भाडेआकारणी सुरू केली असून या बेकायदा भाडेवसुलीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत असल्याचे चित्र आहे.

ठाण्यातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, नितीन कंपनी, ज्ञानेश्वरनगर, कामगार नाका येथून ठाणे स्थानकात जाण्यासाठी एका प्रवाशाकडून १५ ते २० रुपये भाडे शेअर रिक्षाचालक आकारत होते. परंतु चारऐवजी दोनच प्रवाशांची वाहतूक करावी लागत असल्याने रिक्षाचालकांनी प्रति प्रवासी भाडय़ात दहा रुपयांनी वाढ केली आहे. डोंबिवली येथील उमेशनगर, दोन टाकी, गुप्ते रोड, महात्मा फुले रोड, आनंदनगर भागात एका प्रवाशाकडून १० रुपये शेअर रिक्षाचे भाडे आकारले जात होते. मात्र, या ठिकाणीही प्रति प्रवासी भाडय़ात दहा रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळामध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. टिटवाळा स्थानकाहून गणेश मंदिराकडे जाण्यासाठी यापूर्वी एका प्रवाशाकडून १० रुपये आकारले जात होते. परंतु आता एका प्रवाशाकडून २० रुपये भाडे घेतले जात आहे. या भाडेवाढीमुळे रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये खटके उडत असून प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

भाडेवाढीमागचे कारण

गेले दोन ते तीन महिने रिक्षा बंद असल्यामुळे अनेक रिक्षाचालकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकदा रिक्षा थांब्यावर प्रवाशांची वाट बघत एक-एक तास उभे राहावे लागत आहे. त्यामुळे ही भाडेवाढ केल्याचे अनेक रिक्षाचालकांकडून सांगण्यात येत आहे. तसेच शेअर रिक्षातून चारऐवजी केवळ दोन प्रवाशांची वाहतूक करावी लागत असून यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने ही भाडेवाढ केल्याचे रिक्षाचालकांकडून सांगण्यात आले.

रिक्षाचालकांना भाडेवाढ करायची असल्यास मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण या समितीची परवानगी घ्यावी लागते. मात्र, टाळेबंदीच्या काळात रिक्षाचालकांना प्रवासी वाहतूक करताना सामाजिक अंतराचा नियम पाळणे अनिवार्य आहे. हे नियम पाळताना रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून जास्त भाडेआकारणी करू नये. जर असे केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

-रवी गायकवाड, मुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे.