बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात तापमानाचा पारा खाली आल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी जानेवारी यंदाच्या वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात झाली. बदलापुरात १४.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल कल्याण, ठाणे या शहरात अनुक्रमे १६.५ आणि १७.५ अंश सेल्सियची नोंद झाली. पारा घसल्याने जिल्ह्यात धुकेही पसरल्याचे दिसून आले. त्याचा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम जाणवला.

शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये तापमानात घट दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून थंडीला पोषक वातावरण असल्याने थंडी जाणवते आहे. शुक्रवारी जिल्ह्यात सरासरी तापमान १५ अंश सेल्सियसवर आले होते. ठाणे जिल्ह्यात बदलापूर शहरात सर्वात कमी म्हणजे १४.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. यापूर्वी डिसेंबर महिन्यात बदलापुरात १४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अजुनही थंडीचा तसा कडाका जाणवलेला नाही.

जिल्ह्यात कल्याण शहरात १६.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर ठाणे शहरात १७.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. तापमानात घट झाल्याने ठाणे जिल्ह्याला हुडहुडी भरली होती. शुक्रवारी घटलेल्या तापमानासह हवेतही धुके पसरले होते. त्यामुळे अनेक रस्ते, उंच इमारती धुक्यात गुडूप झाल्या होत्या. धुक्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही काही काळ परिणाम जाणवला. आणखी दोन दिवस अशाच प्रकारी थंडीचे असतील अशी माहिती खासगी हवामान अभ्यासकांनी दिली आहे.

हेही वाचा : राज्यात आजपासून थंडी कमी, तापमानाच्या पाऱ्यात वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कडाक्याची थंडी संक्रांतीनंतरच

सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आणि दक्षिणेतून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे ७ जानेवारीनंतर पुन्हा तापमानात वाढ झाल्याचे दिसून येईल. तसेच थंडी काही अंशी कमीही होईल. मात्र मकर संक्रांतीनंतर थंडीसाठी पोषक वातावरण असणार आहे. त्यामुळे त्यानंतर पारा आणखी खाली जाईल आणि चांगली थंडी जाणवेल, अशी माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.