बदलापूर: Election BJP Shivsena : जिथे युतीतील मित्रपक्ष तुल्यबळ आहेत तेथे मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विविध महापालिका, नगरपालिकांमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. त्याच धर्तीवर बदलापूर शहरात महायुतीतील भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली युती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे युती जाहीर करत असताना शिवसेनेला मात्र बाजूला सारले आहे.
गेल्या काही महिन्यात बदलापूर शहरात स्थानिक भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकमेकाच्या पक्षातील इच्छुकांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपा आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांकडून केला जातो आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलेली ही घोषणा शिवसेनेसाठी मोठे आव्हान मानले जाते आहे.
संपूर्ण राज्यात येत्या काही दिवसात नगरपरिषदा, महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांसारख्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांची प्रक्रिया विविध स्तरापर्यंत पोहोचली आहे. ठाणे जिल्ह्यात असलेल्या अ वर्ग नगर पालिका म्हणून अंबरनाथ आणि बदलापूर या नगर पालिका महत्वाच्या आहे. या पालिकांमध्ये यापूर्वी शिवसेनेचे वर्चस्व होते. येथे महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तितकेसे मजबूत स्थितीत नव्हते. मात्र भाजपाने ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष देऊन आपली संघटनात्मक बांधणी मजबूत केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठाणे जिल्ह्यात आशिष दामले यांच्या रूपाने परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मंत्रिपद देऊ केले आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष शिवसेनेला आव्हान देण्याच्या स्थितीत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत. गेल्या काही महिन्यात या दोन्ही नगरपालिकांमध्ये माहितीतील पक्षांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतो आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शिंदे गटाचे बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून मोठा संघर्ष पाहायला मिळतो आहे. हा संघर्ष पालिका निवडणुकांच्या तोंडावर आणखी तीव्र झाला आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या पक्षातील नाराज गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेने तर इच्छुक उमेदवारांना निवडून येण्याच्या निकषावर तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. अशा पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर रविवारी भाजपचे आमदार किसन कथोरे आणि परशुराम आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी एकत्र येत पालिका निवडणुकांसाठी आपली स्वतंत्र युती जाहीर केली आहे. येत्या पालिका निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे राज्यात शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत सहभागी आहोत. मात्र दुसरीकडे स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढण्याची तयारी दाखवत असतानाच भाजपने राष्ट्रवादीची मिळवलेली साथ शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी पुरेसी असल्याची चर्चा होऊ लागली आहे. या युतीमुळे शिवसेने समोर दुहेरी आव्हान असेल असे बोलले जाते.
इच्छा असेल तर युतीत येतील
भाजपा आमदार किसन कथोरे यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीची घोषणा करत असताना ज्यांना आमच्या सोबत यायचे आहे ते येऊ शकतात. आम्ही युतीत कोणालाही घेणार नाही असे म्हटलेले नाही असे वक्तव्य केले आहे. मात्र गेल्या काही दिवसातील शिवसेना आणि भाजपातील संघर्ष पाहता कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी थेट लढत पाहायला मिळण्याची चर्चा शहरात रंगली आहे.