ठाणेः अंबरनाथ शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या आणि लवकरच लोकार्पण होऊ घातलेल्या भव्य नाट्यगृहाला कै. बाळ कोल्हटकर या लोकप्रिय आणि यशस्वी नाटककार, दिग्दर्शक, नाट्यनिर्माते आणि अभिनेते यांचे नाव द्यावे अशी मागणी त्यांची मुलगी भाषा अमरेंद्र फाटक यांनी केली आहे. बाळ कोल्हटकरांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यानिमित्त महाराष्ट्र सरकारने त्याचे नाव द्यावे अशी मागणी करणारे निवेदनही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना दिले आहे.

बाळ कोल्हटकर यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२६ रोजी सातारा येथे झाला असला तरी त्यांचे १९६० ते १९७२ या काळात अंबरनाथ येथे वास्तव्य होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या काही गाजलेल्या नाटकांची निर्मिती पूर्ण केली होती. शासनाने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ म्हणून एक सांस्कृतिक कार्यक्रम सातारा येथे फेब्रुवारी २०२५ मध्ये केला होता. त्यामुळे बाळ कोल्हटरकरांचे नाव नाट्यगृहाला द्यावे अशी मागणी सर्वप्रथम अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाला केली होती. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनीही भाषा फाटक यांच्यासह यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवेदन दिले होते. जिल्ह्यातील इतर भाजप आमदारांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवला होता, अशी माहिती फाटक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील विजय केंकरे, महेश मांजरेकर, विजय गोखले, सुनील बर्वे यांसारखे कलाकार आणि निर्माते, नाट्यरसिकांचीही हीच मागणी आहे. मराठी नाट्यसृष्टीतले एक ज्येष्ठ, नामवंत आणि यशस्वी नाटककार, नाट्य निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आणि कवी अशा विविध भूमिकांमध्ये सुमारे तीन दशके त्यांनी रंगभूमी गाजवली. मराठी भाषेवरील त्यांचे विलक्षण प्रभुत्व पाहून “महाराष्ट्राचा छोटा गडकरी” अशी बिरुदावली त्यांना प्रख्यात लेखक महादेवशास्त्री जोशी आणि तत्कालिन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बहाल केली होती.

मुंबईतील पु. ल. देशपांडे नाट्य अकादमी आणि दीनानाथ नाट्यगृह, ठाण्याचे गडकरी रंगायतन व काशिनाथ घाणेकर नाट्यगृह तसेच कल्याणचे आचार्य अत्रे रंगमंदिर अशा अनेक नाट्यगृहांना त्या त्या थोर रंगकर्मी व साहित्यिक यांची नावे देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. परंतु, बाळ कोल्हटकर यांच्या नावाने कोणतेही नाट्यगृह नाही. म्हणून अंबरनाथ येथील सदर नाट्यगृहास बाळ कोल्हटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात नाव देऊन त्यांच्या नाट्यसृष्टीतील कार्याचा यथोचित सन्मान करावा, अशी समाजातील अनेक स्तरांतून मागणी होत आहे.

चौकट जोहार, आकाशगंगा, सीमेवरून परत जा, प्रतिष्ठित भामटे, मला निवडून द्या, दुरितांचे तिमिर जावो (पंधराशे प्रयोग), अंगाई, वेगळं व्हायचंय मला, वाऱ्यात मिसळले पाणी, उघडले स्वर्गाचे द्वार, मुंबईची माणसं (दोन हजारांच्या वर प्रयोग), शिवराय कवी भूषण, एखाद्याचे नशीब (हजारावर प्रयोग), वेगळं व्हायचयं मला, लहानपण देगा देवा, देणाराचे हात हजार, विद्या विनयेन शोभते, अवघा आनंदीआनंद, देव दीनाघरी धावला, वाहतो ही दुर्वांची जुडी (चौदाशे प्रयोग) अशी ३० हून अधिक नाटके त्यांनी लिहिली.

उठी उठी गोपाळा ही भूपाळी, लाविते मी निरांजन, निघाले आज तिकडच्या घरी, आई तुझी आठवण येते आणि ॠणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी ही त्यांची काही लोकप्रिय गीते आहेत. विक्रम गोखले, आशा काळे आणि गणेश सोळंकी (वाहतो ही दुर्वांची जुडी) या अभिनेत्यांना त्यांनी प्रथम संधी दिली. त्यानंतर विजय गोखले व निवेदिता जोशी (वाहतो ही दुर्वांची जुडी), रमेश भाटकर (देणार्याचे हात हजार व उघडले स्वर्गाचे दार) आणि अर्चना जोगळेकर (उघडले स्वर्गाचे दार) या कलाकारांना रंगभूमीवर पदार्पणाची संधी त्यांनीच दिली. हे सर्व कलाकार पुढे या क्षेत्रात यशस्वी झाले.