Mumbai Maratha Reservation Protest Manoj Jarange : ठाणे : जाती-पातीचे राजकारण बाजूला ठेवून मूळचे बीड भागातील असलेले आणि दिवा येथे वास्तव्यातील अमोल केंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माणूसकीचा धर्म म्हणून तीन हजार मराठी आंदोलकांसाठी जेवणाची सोय मुंबईतील आझाद मैदानाबाहेर जाऊन केली. तुमचं-आमचं नात काय, जय जिजाऊ- जय शिवराय असे म्हणत त्यांनी ही मदत केली. तसेच राजकीय कुरघोड्यांमुळे मराठा-ओबीसी वाद पेटल्याचेही ते म्हणाले.

इतर मागासवर्गीय समाजाच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याचा आदेश निघेपर्यंत माघार नाही, या भूमिकेवर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे ठाम असल्याने हजारो मराठा आंदोलक हे मुंबईत ठाण मांडून आहेत. परंतु सरकारने या आंदोलकांची पुरेशी व्यवस्था केली नसल्याने या आंदोलकांचे मोठे हाल होत आहे. मुंबईतील अनेक हाॅटेल बंद आहेत. त्यामुळे या आंदोलकांना दोनवेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. पिण्यासाठी पाणी नाही, जेवण नाही. त्यात पाऊस पडत असल्याने आंदोलकांचे मोठे हाल होत आहेत. या आंदोलकांना मदत व्हावी यासाठी आता विविध संघटना पुढे सरसावत आहेत.

वंजारी समाजाचे नेतृत्त्व करणारे मूळचे बीडचे असलेले तसेच दिवा येथे राहणारे अमोल केंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या आंदोलकांना मदतीचा हात पुढे केला आहे. ते धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी शनिवारी तीन हजार मराठा बांधवांसाठी आझाद मैदान येथे जेवणाची सोय केली होती. राजकीय कुरघोड्या झाल्या आणि मराठा ओबीसी वाद पेटला. मराठा हे देखील आपलेच बांधव आहेत. खेड्या पाड्यातून आलेले मराठा बांधव, माता, भगिनी यांच्यासाठी मुंबईकर म्हणून प्रत्येक,सामाजिक संघटना,मंडळे,समाजसेवक सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे केंद्रे यांनी सांगितले.

माणूसकी सर्वात मोठा धर्म

जगातील सर्वात मोठी जात,आणि सर्वात मोठा धर्म माणूसकी आहे. मुंबई मधील सर्व नागरिकांना संस्था,मंडळे,सामाजिक संघटना सर्वांना विनंती करत आहोत सर्वांनी आपले कर्तव्य समजून आपल्या जनतेच्या पाठी खंबीरपणे उभे रहा. त्यांना कोणतीही अडचण येऊ देऊ नका. मुंबईकर म्हणून आंदोलनकर्त्यांच्या पाठी खंबीर पणे उभे राहूया असेही केंद्रे म्हणाले.