ठाणे : शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेचा शहरातील विविध नागरी प्रश्नांवर मोर्चा निघाला. या मोर्चात ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर कडाडून टीका केली. तसेच त्यांच्या बारचा मुद्दा देखील उपस्थित केला. भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.

ठाणे शहरातील वाहतुक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, पाणी प्रश्न तसेच ठाणे महापालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप करत सोमवारी सायंकाळी ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेने मोर्चा काढला होता.ठाण्यातील गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा निघाला होता. या मोर्चात ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, मनसे नेते अभिजीत पानसे, अविनाश जाधव, काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, मनसेचे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांच्यासह ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा भागातील महाविकास आघाडी आणि मनसेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत भास्कर जाधव यांनी सत्ताधारी शिंदे गटावर टीका केली.

रामदास कदमांवर टीका

  • बायका नाचवायच्या, त्याच्यावर पैसे उडवायचे आणि ते गोळा कोणी करायचे, रामदास कदमांनी. रामदास कदम गृहराज्यमंत्री होते म्हणतात. ३० वर्षापूर्वीचा बार आहे असे ते म्हणतात, म्हणजे ३० वर्षे छमछम सुरु होती असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. तुम्ही बारमध्ये बारबाला नाचवता आणि तेथून पैसे कमवता आणि ते लोकांना वाटता आणि तुमच्या त्या घाणरड्या तोंडाने तुम्ही मातोश्री बद्दल बोलता असेही ते म्हणाले.

मातोश्री बद्दल बोलताना जीभ झडल्या पाहिजे

  • तुम्ही मातोश्री बद्दल बोलताना तुमच्या जीभा झडल्या पाहिजेत, त्यांचे तुकडे पडले पाहिजेत. शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूचे अशा पद्धतीने राजकीय भांडवल का? असा प्रश्नही त्यांनी केला. जर एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचार मानणारे असते तर त्यांनी रामदास कदम यांची जीभ हसडायला पाहिजे होती. पण ते मात्र कुठे काय झालं नाही अशी टीका त्यांनी शिंदेंवर केली.

नरेंद्र मोदी, अमित शहांसमोर जी हुजूर…

  • हिंदी भाषा सक्तीविरोधात मराठी लोक एकत्र आले. पण एकनाथ शिंदे, तुमचा पक्ष कुठे होता. तुम्हाला फक्त आणि फक्त अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर जी हुजूर… आज्ञा हुजूर करायचे आहे असेही ते म्हणाले.