कल्याण – मुसळधार पावसामुळे रविवारी संध्याकाळी शहापूर जवळील सापगाव येथील भातसा नदी पुलावरून पाणी वाहत होते. या वेगवान प्रवाहामुळे पुलावरील डांबरी रस्त्याचे थर वाहून गेले. त्यामुळे सोमवारी सकाळी या पुलावरील खराब रस्त्यावरून वाहने जावू देणे धोक्याचे असल्याने पोलिसांनी सोमवारी सकाळी पुलावरून जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद केली होती. परंतु, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महांमडळाच्या अधिकाऱ्यांनी दुपारी पुलाची पाहणी केली. आवश्यक दुरुस्ती केल्यानंतर भातसा नदीवरील पूल दुपारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
शहापूर तालुक्यातील सुमारे दीडशे गावांना जोडणारा हा पूल आहे. रविवारी दुपारी भातसा धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर संध्याकाळी सापगाव जवळील भातसा नदी पुलावरून वेगवान प्रवाहाने पाणी वाहत होते. या वेगवान प्रवाहामुळे या पुलावरील वाहतूक रविवारी संध्याकाळपासून बंद करण्यात आली होती.
त्यामुळे किन्हवली, डोळखांब, लेनाड, शेंद्रुण, अल्याणी भागातून येणारी आणि शहापूरकडून या परिसरात जाणारी वाहने या पुलाच्या दुतर्फा अडकून पडली होती. मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने आणि पुलावरील पाणी वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्ग गाठून मुरबाडमार्गे इच्छित स्थळी जाणे पसंत केले. काही वाहन चालक खुटघर कोळकेवाडी येथून समृध्दी महामार्गाने इच्छित स्ठळी गेले.
शहापूर पुलावरील डांबरी रस्त्याचे थर वाहून गेल्याची माहिती महसूल, पोलिसांकडून या पुलाची नियंत्रक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला माहिती देण्यात आली. दुपारी राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सिध्दार्थ वाहुले भातसा नदी पुलावर आले. यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा उपस्थित होते.
भातसा नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्यामुळे या भागातील नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी, कष्टकरी, मजुरांचे हाल होतील. शहापूर ग्रामीण, आदिवासी परिसरातील नागरिक हा या पुलाच्या माध्यमातून वाहनाने शहापूर परिसरातील आस्थापना, आसनगाव रेल्वे स्थानकाच्या माध्यमातून नोकरीसाठी ठाणे, मुंबईत जातो. त्यामुळे पुलासंदर्भात योग्य निर्णय घेण्याची मागणी कार्यकारी अभियंता वाहुले यांना स्थानिक जाणते नागरिक आणि माजी आमदार बरोरा यांनी केली.
पुलाची आवश्यक पाहणी केल्यानंतर या पुलावरील खड्डे तातडीने भरणी करण्याचे, पुलाचे तुटलेले दोन्ही बाजुचे कठडे सुस्थितीत करण्याची हमी एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता वाहुले यांनी उपस्थितांना दिली. पुलाला तसा कोणताही धोका नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. पुलावरील खड्डे भरणीची कामे तातडीने सुरू करण्यात आली. पुलाच्या दोन्ही बाजुच्या पोहच रस्त्यांवर खडी टाकण्यात आली. रस्ता सुस्थितीत झाल्यावर या पुलावरील सकाळपासून बंद असलेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सर्व प्रकारची वाहने या पुलावर आता धावत आहेत.
भातसा नदी पुलाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तरीही या भागात विकास पुरूषासारखा फिरणारा एक लोकप्रतिनिधी सकाळपासून भातसा नदी पुलाकडे न फिरकल्याने नागरिक, नोकरदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्ते, पायवाटांचे नारळ वाढविणे म्हणजे विकास नाही, अशी टीका यावेळी नागरिकांकडून करण्यात येत होती.