ठाणे – भिवंडीत अंमली पदार्थांचा बेकायदेशीरपद्धतीने साठा करणाऱ्या दोन आरोपींना भिवंडी गुन्हे शाखा घटक २ च्या पोलिसांनी अटक केली आहे. अश्पाक अहमद मोहम्मद हसन मोमीन (३९) आणि अब्दुलरजा अलीरजा सिध्दिकी (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
भिवंडीतील गुलजार नगर याठिकाणी कफ सिरफ या अंमली पदार्थांचा अंश असलेल्या औषधी बाटल्यांचा बेकायदेशिरपणे साठा एका गाळ्यात केला असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखा, घटक-२ च्या पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जनार्दन सोनवणे आणि सहाय्यक पोलिस निरिक्षक राज माळी तसेच त्यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकत कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी अश्पाक आणि अब्दुलरजा या दोघांना ताब्यात घेतले. हे दोघेही भिवंडी शहरातील रहिवाशी आहेत.
पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेवुन त्यांकडून नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोरेक्स कफ सिरफ च्या १००मिली अशा सुमारे ३ लाख ७४ हजार ४०० रुपये किंमतीच्या १ हजार ९२० बाटल्यांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अश्पाक आणि अब्दुलरजा या दोघांविरुद्धात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई डॉ. पंजाबराव उगले (अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे), अमरसिंह जाधव( पोलीस उप आयुक्त, गुन्हे) आणि शेखर बागडे, (सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शोध १) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि सहाय्यक पोलिस निरिक्षक राज माळी, मिथुन भोईर, पोलिस उपनिरिक्षक रविंद्र पाटिल, सपोउपनि सुधाकर चौधरी, सुनिल साळुंखे, पोलिस हवालदार सुदेश घाग, साबीर शेख, शशिकांत यादव, प्रशांत राणे, वामन भोईर, साबिर शेख, पोलिस शिपाई अमोल इंगळे, भावेश घरत, विजय कुंभार, रविंद्र साळुंखे यांनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा, घटक-२ भिवंडी हे करीत येत आहे.