ठाणे : तिथीनुसार संभाजी महाराज जन्मोत्सव आणि शिवराज्यभिषेक दिनानिमित्त भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जन्मोत्सव सोहळा, महिलांच्यावतीने पाळणा सादरीकरण, शिवतुलादान, देवीचा गोंधळ, पोवाड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, ८ जून आणि सोमवार, ९ जून रोजी असणार आहे. भिवंडी मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात दोन दिवसीय सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याचे आयोजन शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक राजु चौधरी यांनी दिली रविवार, ८ जून रोजी संभाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती असल्याने सकाळच्या सत्रात मंदिरात स्वराज्य तोरण उभारले जाणार आहे. त्यानंतर जन्मोत्सव सोहळा आणि पाळणा सादरीकरण केले जाणार आहे. तर सायंकाळी शिवतुलादान, देवीचा गोंधळ आणि रात्री शाहिरांच्या पोवाड्याचा कार्यक्रम असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर सोमवार, ९ जून रोजी हिंदु साम्राज्य दिन, ध्वज पुजन, तुळजा भवानी, महादेव आणि जिजाऊ यांची विधिवत पुजा, शिवराज्याभिषेक सोहळा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक सोहळा असणार आहे. या दोन दिवसीय सोहळ्यास शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजु चौधरी यांनी केले आहे.