ठाणे : भिवंडी येथील अंजुरचौक ते अंजुरफाटा भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटे या भागात गर्डर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत येथील वाहतुक पूर्णपणे बंद असणार आहे. येथून वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांना पर्यायी मार्गाने वाहतुक करण्याच्या सूचना वाहतुक पोलिसांनी केल्या आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गांवर कोंडीची शक्यता आहे.

नवी मुंबई येथून मुंब्रा बाह्यवळण, मानकोली आणि मुंबई येथून माजिवडा, खारेगाव टोलनाका मार्गे गुजरातच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना गॅमन रोड आणि माजिवडा येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने घोडबंदर मार्गे वाहतुक करतील. मुंबई, नवी मुंबई येथून कापूरबावडी, बाळकूम मार्गे भिवंडीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना बाळकुम नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कापूरबावडी चौक, माजिवडा, खारेगाव मार्गे वाहतुक करुन भिवंडीत जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरात येथून चिंचोटी मार्गे अंजुरफाटा मार्गे, नाशिक, नवी मुंबई आणि मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना चिंचोटी येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने चिंचोटी, फाऊंटन, घोडबंदर मार्गे वाहतुक करतील. अंजुरफाटा मार्गे मुंबई, गुजरातच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना कल्याणनाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कल्याणनाका येथून अशोकनगर, भादवड, रांजनोली, कोनगाव मार्गे वाहतुक करतील. हे वाहतुक बदल सोमवारी (आज) रात्री ११ ते मंगळवारी पहाटे ५ यावेळेत लागू असतील.