मार्गशीर्ष मासाची संधी साधून किरकोळ बाजारात ग्राहकांची लूट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यभर थंडीची दुलई पसरताच भाजीपाल्याच्या उत्पादनावर गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने जाणवणारे ‘दुष्काळा’चे सावट काहीसे ओसल्याचे चित्र गेल्या पंधरवडय़ापासून दिसू लागले असून वाशी, ठाणे आणि कल्याणच्या घाऊक बाजारपेठेत सर्वच भाज्यांचे दर कमालीचे रोडावले आहेत. मात्र, मार्गशीर्ष महिन्याचा पुरेपूर फायदा उचलत किरकोळ बाजारात टोमॅटोपासून कोबीपर्यंतच्या भाज्या किलोमागे ४० रुपये अधिक महाग दराने विकल्या जात आहेत. गुजरातमधून होणारी आवक घटण्याची भीती दाखवून कोबी, फ्लॉवरचे किरकोळ बाजारातील दर घाऊकच्या तुलनेत पाच ते सहा पट वाढवण्यात आले आहेत.

प्रतिकूल हवामानामुळे गेल्या सहा महिन्यांपासून भाज्यांचे दर सातत्याने वाढत होते. यंदा पावसाचे प्रमाण घटल्याने दुष्काळाची छाया भाजीपाल्यांच्या दरांवर सातत्याने दिसून येत आहे. डाळींच्या सोबतीला कधी कांदा तर कधी टॉमेटो अशा भाज्यांच्या दरांनीही टोक गाठले होते. गेल्या पंधरवडय़ापासून मात्र भाजीपाल्याच्या घाऊक बाजारात स्वस्ताई अवतरली आहे. पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ातून मुंबईस होणारी भाजीपाल्याची आवक ‘जैसे थे’ असली तरी परराज्यातून मुंबई, ठाणे परिसरात मोठय़ा प्रमाणावर भाजीपाला येत आहे, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) भाजीपाला व्यापारी शंकर िपगळे यांनी दिली. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक यांसारख्या राज्यातून मुंबईच्या बाजारपेठेत वाटाणा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, भेंडी, गाजर यांसारख्या भाज्यांची मोठी आवक होत असून दिवसाला किमान ५५० ते ६०० गाडय़ा वाशी येथील घाऊक बाजारात येत आहेत, असे िपगळे यांनी स्पष्ट केले.

घाऊक बाजारात भाज्यांचे दर कमी झाले असले तरी किरकोळीचे चित्र मात्र ग्राहकांसाठी सुखावणारे नाही. कोबी आणि फ्लावर घाऊक बाजारात जेमतेम ८ ते १० रुपयांनी विकले जात असले तरी किरकोळीत मात्र या भाज्यांचे दर चाळिशीपेक्षा कमी नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांना रडवणारा कांदा घाऊक बाजारात १५ ते १७ रुपयांनी मिळू लागला आहे. तर २५ ते ३० रुपये किलोने विकला जाणारा वाटाणा किरकोळ बाजारात ६० रुपयांच्या आसपास आहे. भेंडीचे दर ८० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. जळगाव तसेच गुजरात येथून मुंबईस आयात होणारी भेंडीची आवक गेल्या काही दिवसांपासून कमी झाली आहे. तरीही भेंडीचे घाऊक दर अजूनही ३० ते ३२ रुपये इतके आहेत. ठाणे, डोंबिवलीच्या मुख्य बाजारांमध्ये मात्र उत्तम प्रतीची भेंडी ८० रुपयांनी विकली जात आहे. विशेष म्हणजे, येत्या काळात भेंडी शंभरी गाठेल, असेही काही विक्रेते ग्राहकांना सांगत आहेत.

 

काही दिवसांपूर्वी अर्धशतक गाठलेल्या टोमॅटोच्या दरात घट झाल्याने मध्यमवर्गीय ग्राहक सुखावला आहे. गेल्या आठवडय़ापासून वाशी घाऊक बाजारात चौदा ते चोवीस रुपयाला विकला जाणारा टोमॅटो किरकोळ बाजारात मात्र ४० रुपयांपर्यंत विकला जात असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये वाशी घाऊक बाजारातील टोमॅटोच्या दरात दहा रुपयांची घट झाली असली तरीही ठाणे किरकोळ बाजारातील टोमॅटोच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही.

भाज्यांचे                घाऊक दर   (किरकोळ बाजारातील दर कंसात)

भाजी                      २१.१२.१५     २०.१२.१५     १७.१२.१५

टोमॅटो                     २० (४०)      १४ (४०)       २४ (४०)

कांदा                       १७ (३०)       १६ (३०)      १६ (३०)

भेंडी                         ३० (८०)      ३२ (६०)       ३० (६०)

शिमला मिरची        १८  (४०)     १६ (६०)       २२ (६०)

कोबी                        ८ (४०)         ७ (४०)       ८ (४०)

More Stories onवाढHike
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big import but then also vegetable rates hike
First published on: 23-12-2015 at 02:14 IST