लोकसत्ता, ठाणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस मध्यरात्रीपासूनच ठाणे जिल्ह्यात दणक्यात साजरा होताना दिसत आहे. ठाणे, शीळ-कल्याण रस्ता, डोंबिवली, कल्याण या शहरात तर चव्हाण यांना शुभेच्छा देणारे फलक जागोजागी दिसून येत आहेत. यानिमीत्ताने भाजपचे स्थानिक नेते शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत. याच दरम्यान चव्हाण यांच्या सोशल मिडीया अकाउंटवरुन दिला जाणारा संदेश सध्या चर्चेत आला आहे. ‘कुणी पक्ष बदलले, कुणी नेते बदलले, चमत्कार झाला नाही म्हणून कुणी देव बदलले. गद्दारांनो आमच्या सावलीच्या जवळ उभे रहाण्याची अैाकाद आपली नाही’ अशा स्वरुपाच्या या संदेशामुळे सध्या कल्याण डोंबिवलीच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना उत आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांच्यातील सलगीचे राजकारण सुरुवातीपासून ठाणे जिल्ह्यात आणि विशेषत: डोंबिवली परिसरात नेहमीच चर्चेत राहीले. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणुक असो अथवा विधानसभा-लोकसभेचा रणसंग्राम चव्हाण आणि शिंदे ही जोडगोळी नेहमीच चर्चेत राहीली. गेल्या काही वर्षांपासून मात्र हे चित्र बदलले. २०१४ मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिंदे यांचे पुत्र डाॅ.श्रीकांत निवडून आले आणि त्यानंतर झालेली पहिलीच महापालिका निवडणुक शिवसेना आणि भाजपने एकमेकांविरोधात लढवली.
ही निवडणुक हे दोन पक्ष इतक्या निकराने लढले की स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षात त्याचे पडसाद अजूनही उमटताना दिसतात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग होता. या काळात डोंबिवलीत चव्हाण यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सतत झाले असेही म्हणतात. कोवीड काळात तर चव्हाण कमालिचे अस्वस्थ होते. राज्यात महायुतीचे सरकार आले आणि मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले.
हा बदल डाॅ.श्रीकांत यांच्या पथ्यावर पडला. अजूनही डाॅ.श्रीकांत म्हणतील तीच पुर्व दिशा असा कारभार कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आहे. कल्याण पुर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदेसेनेतील संघर्ष लपून राहीलेला नाही. डोंबिवलीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उमेदवार सापडत नसताना ऐनवेळी दिपेश म्हात्रे यांनी खासदार शिंदे यांची साथ कशी सोडली याची उलटसुलट चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण यांच्या फेसबुक तसेच इन्टाग्राम अकाउंटवर दिवसभर सुरु असलेली पोस्ट जोरदार चर्चेत आहे.
काय आहे हे रीलमधील संदेश..
रविंद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या या रील मधील संदेशात ‘कुणी पक्ष बदलले कुणी नेते बदलले, कुणी झेंडे बदलले, कुणी इमान बदलले, कुणी निष्ठा बदलली’ अशा वाक्याने सुरुवात आहे. ‘मात्र आम्ही ना कधी झेंडे बदलले, ना निष्ठा ना नेता , ना इमान. आणि म्हणूनच म्हणतो चमत्कार झाला नाही म्हणून देव बदलणारी अैालाद आमची नाही. अरे गद्दारांनो आमच्या सावलीच्या जवळ उभी रहाण्याची अैाकाद तुमची नाही’ असा थेट आणि स्पष्ट संदेश या रीलच्या माध्यमातून देण्यात आला आहे. दरम्यान हा संदेश नेमका कुणासाठी होता आणि या संदेशाचे मुळ कल्याण डोंबिवलीतील राजकीय सत्तासंघर्षात लपले आहे का असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.