नव्या समीकरणामुळे ठाणे जिल्ह्य़ात भाजप नेत्यांची कोंडी; चौकशी, भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या फैरीही थंडावणार

गेल्या अडीच वर्षांत एकनाथ शिंदे यांची जिल्ह्यातील प्रशासकीय कारभारावरील पकड निर्विवाद अशी होती.

bjp flag
संग्रहित छायाचित्र

जयेश सामंत

ठाणे : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे ठरवतील तीच पूर्वदिशा असा कारभार राहिलेल्या ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिकांमधील कारभाराविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठवत आगामी निवडणुकांच्या प्रचारासाठी पद्धतशीर नेपथ्यरचना करणारे भाजपचे स्थानिक नेते सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे गोंधळून गेले आहेत.

स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांमधील अनियमितता, ठाणे-दिव्यातील तीव्र पाणीटंचाई, नवी मुंबईतील कंत्राटी कामांत ‘शिंदेशाही’चा वाढता हस्तक्षेप, डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप करत भाजप नेते गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरची लढाई लढताना दिसत होते. ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी तर थेट शिंदे यांच्यावर टीकेची एकही संधी सोडली नव्हती. बदललेल्या राजकीय परिस्थितीत ‘संघनिष्ठ’ राहिलेल्या केळकर यांच्यापासून ‘नव भाजपाई’ असलेल्या गणेश नाईकांपर्यत शिंदे यांच्याविरोधातील तलवार म्यान करावी लागेल, असेच सध्याचे चित्र आहे.

गेल्या अडीच वर्षांत एकनाथ शिंदे यांची जिल्ह्यातील प्रशासकीय कारभारावरील पकड निर्विवाद अशी होती. मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि सिडकोसारख्या मलईदार प्राधिकरणांमध्ये शिंदे यांना फारशी मोकळीक दिली जात नसल्याच्या कुरबुरी त्यांच्या समर्थकांकडून दबक्या आवाजात सुरू होत्या. मात्र जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांमधील कारभारात शिंदे यांचा शब्द प्रमाण मानला जात होता. नवी मुंबईसारख्या वर्षांनुवर्षे गणेश नाईक यांच्या ताब्यात राहिलेल्या महापालिकेतही शिंदेशाहीचे वाढते वर्चस्व गणेशदादांसाठी त्रासदायक ठरू लागले होते. महापालिका तसेच नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे या सर्व शहरांमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अत्यंत आक्रमकपणे शिवसेनेविरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केली होती. नवी मुंबईत नाईकांनी तर ठाण्यातील ‘चोरांना’ नवी मुंबई लुटू दिली जाणार नाही असा आवाज दिला होता. शिंदे आग्रही राहिलेल्या वाशी येथील उड्डाणपुलाच्या कामासही झाडांच्या कापणीच्या मुद्दय़ावरून नाईकांनी विरोध केला होता.

पक्ष नेत्यांचा प्रयत्न फोल?

ठाणे महापालिका क्षेत्रात एकनाथ शिंदे यांची मोठी ताकद राहिली आहे. मूळ शहराचा अपवाद वगळला तर महापालिका क्षेत्रात भाजपला फारसे पाय पसरता आलेले नाहीत. तरीही गेल्या काही वर्षांत आमदार संजय केळकर, शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी महापालिकेतील अनियमित कारभाराचे मुद्दे आणि पक्ष संघटनेच्या पातळीवर प्रयत्नांची शर्थ सुरू केली होती. स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून सुरू असलेल्या कंत्राटी कामात शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला होता. या मुद्दयावर राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेतली होती. पुरी यांनीही तातडीने या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश दिले होते. आता या चौकशीचे नेमके काय होईल असा संभ्रम भाजपच्या नेत्यांपुढे आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्यात सत्ता बदल होईल हा विश्वास असला तरी जिल्ह्यात ज्यांच्याविरोधात आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करत होते त्याचे काय करायचे हा प्रश्नच आहे असे एका भाजप नेत्याने सांगितले.

भाजपने उपस्थित केलेले काही मुद्दे

  • स्मार्ट सिटी अभियानात ठाणे महापालिकेत कोटय़वधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप. कामांच्या वाढीव रकमा, अपूर्ण, निकृष्ट दर्जाची कामे. केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी चौकशीचे आदेश दिले होते.
  • ठाण्याची पाणीटंचाईच्या मुद्दय़ावर  आंदोलने. दिवा भागातील पाणीटंचाईसाठी हंडा मोर्चे. कोपरी भागातील पाणी शिवसेनेचे महापौर चोरतात असा आरोप भाजपने केला होता.
  • कौसा येथील रुग्णालयाच्या बांधणीतील घोटाळा. वाढीव रकमेचे कंत्राट दिल्याप्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप.
  • ठाणे शहरातील बीएसयूपी योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप. घरांची बांधणी निकृष्ट तसेच वाढीव खर्चाच्या मुद्दय़ावर शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp leaders equation inquiries allegations corruption cool down ysh

Next Story
शिंदे समर्थकांचा जल्लोष
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी