ठाणे : मुंब्रा येथील शीळ भागातील १७ बेकायदा इमारतींची उच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार आता न्यायालयीन चौकशी होणार आहे. त्यासाठी ठाणे जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश एस.बी अग्रवाल यांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जी. जी. बन्साली यांची नियुक्ती केली असून ही समिती जमीन मालक, बांधकाम व्यावसायिक, पालिका अधिकारी अशी सर्वांची चौकशी करणार असल्याचे समजते.
या बेकायदा इमारती गेल्या वर्षी उभारण्यात आल्या. याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने १२ बांधकामे जमीनदोस्त केली तर, उर्वरित बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू आहे. सुनावणीदरम्यान, एक वरिष्ठ न्यायिक अधिकारी नियुक्त करून बेकायदा बांधकामांमध्ये जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करावी, त्यात महापालिकेचे अधिकारी व आयुक्त यांच्यासह जबाबदारी निश्चित करावी, चौकशी सुरू झाल्यानंतर सहा आठवड्यांच्या आत अहवाल सादर करावा असे आदेश न्यायालयाने दिले होते.
या अहवालाच्या आधारे न्यायालय पुढील योग्य आदेश देणार आहे. महापालिकेचे अधिकारी दोषी आढळले, तर कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाच्या सुचनेनंतर ठाणे जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश एस.बी अग्रवाल यांनी चौकशी अधिकारी नियुक्त केला आहे. याप्रकरणातील जमीन मालक, बांधकाम व्यावसायिक, पालिका अधिकारी अशी सर्वांचीच चौकशी करणार असून ही प्रक्रीया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती न्यायालयीन सुत्रांनी दिली.