लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : पाचपाखाडी येथील कचराळी तलाव भागात मंगळवारी सायंकाळी इमारतीच्या विद्युत वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इमारतीच्या आठव्या मजल्यापासून ते १५ व्या मजल्यापर्यंत आग लागली. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांनी येथील १८ ते २० रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. रहिवाशांमध्ये वृद्धांचाही सामावेश होता. पथकांनी त्यांना जिन्यावरून उचलून त्यांची सुटका केली. पथकांच्या प्रयत्नामुळे येथील मोठी दुर्घटना टळली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कचराळी तलाव येथे कृष्णा गृहसंकुलात १५ मजली इमारत आहे. या इमारतीत ६० सदनिका आहेत. मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास इमारतीच्या आठव्या मजल्यावरील विद्युत डक्टमध्ये तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. अवघ्या काही मिनीटांत ही आग १५ व्या मजल्यापर्यंत पसरली. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी १८ ते २० रहिवाशांना इमारतीमधून बाहेर काढले. पथकांनी वृद्धांना जिन्यांवरून उचलून खाली आणले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास येथील आगीवर नियंत्रण मिळविण्यास पथकाला शक्य झाले.