ठाणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. असे असले तरी हा प्रकल्प प्रत्यक्षात केव्हा सुरू होणार, याविषयीची नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. त्यावर केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव ( Ashwini Vaishnaw ) यांनी प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू होणार, याची सविस्तर माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील शिळफाटा बोगद्याच्या ब्रेकथ्रू कार्यक्रम शनिवारी केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पार पडला. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) तर्फे घणसोली येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी मंत्री वैष्णव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुंबई, ठाण्यात बुलेट ट्रेन कधी धावणार
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे ९ तासांचा प्रवास २ तासांवर येणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. तसेच या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम २०२७ मध्ये पूर्ण होणार आहे तर, त्यांच्या पुढच्या टप्प्यात म्हणजेच २०२८ मध्ये ठाणे आणि त्यानंतर २०२९ मध्ये मुंबईत बुलेट ट्रेन धावेल, अशी माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
बुलेट ट्रेन प्रकल्प असा आहे
देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाला म्हणजेच मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सुमारे ५०८ किलोमीटर लांबीचा आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. हा मार्ग मुंबई ते अहमदाबाददरम्यान उभारला जात असून, प्रवासाचा कालावधी केवळ २ ते २.३० तासांमध्ये पूर्ण होणार आहे. सध्या या प्रवासाला ९ तासांहून अधिक वेळ लागतो. या प्रकल्पात एकूण १२ स्थानके असून, त्यात मुंबई, ठाणे, विरार, बोइसर, वलसाड, सूरत, भरुच, वडोदरा, आनंद आणि अहमदाबादचा समावेश आहे. ठाणे–शिलफाटा विभागात तब्बल २१ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार होत असून, त्यातील ७ किलोमीटर भाग हा समुद्राखालील बोगदा आहे. जपानकडून मिळालेल्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारला जात असून या प्रकल्पाचा खर्च अंदाजे १.०८ लाख कोटी आहे.