डोंबिवली : ठाकुर्ली जवळील ९० फुटी रस्त्यावर एका निर्माणाधीन इमारतीच्या चौथ्या माळ्यावर सुतारकीचे काम करत असताना तोल जाऊन पडून एक २६ वर्षाचा सुतार गंभीर जखमी झाला आहे. हे काम करताना या सुताराला इमारतीचे विकासक, कामगार ठेकेदार आणि पर्यवेक्षक यांनी अंगरक्षेची सुरक्षा साधने न दिल्याने या सुताराच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा ठपका टिळकनगर पोलिसांनी ठेवला आहे. याप्रकरणी संबंधित विकासक, पर्यवेक्षक आणि कामगार ठेकेदारावर पोलिसाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिळकनगर पोलीस ठाण्याचे हवालदार सर्फराज मेहबुब तडवी यांच्या तक्रारीवरून विकासक प्रमोद खानविलकर, पर्यवेक्षक रमा भाई आणि कामगार ठेकेदार दीपक पटेल यांच्या विरूध्द भारतीय न्याय संहितेच्या १२५, ३ (५) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावरील आयसीआयसीआय बँकेच्या मागे कुलस्वामिनी ब्रम्हांड इमारत येथे हा अपघात गेल्या आठवड्यात घडला आहे.
पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती अशी, की नीरजकुमार मुन्ना गौतम (२६) हे सुतार म्हणून काम करतात. कल्याण, डोंबिवली शहर परिसरात ते निर्माणाधीन इमारतींमधील दरवाजे, खिडक्या, त्यांची फडताळे तयार करणे, बसविण्याची कामे करतात. नीरजकुमार हे मुळचे उत्तरप्रदेशातील दरियाबाद उन्नाव जिल्ह्यातील ब्रजेश गावचे रहिवासी आहेत. ते आपल्या कुटुंबीयांसह डोंंबिवली परिसरात राहतात. नीरजकुमार यांनी ९० फुटी रस्त्यावरील विकासक खानविलकर यांच्या इमारतीत सुतारकीचे काम मिळाले होते. या कामासाठी कामगार ठेकेदार दीपक पटेल यांनी नीरजकुमार यांनी आणले होते.
कुलस्वामीनी ब्रम्हांंड या निर्माणाधीन इमारतीच्या चौथ्या माळ्यावर नीरजकुमार गौतम गेल्या आठवड्यात सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान सुतारकीचे काम करत होते. हे काम करण्यापूर्वी नीरज इमारतीच्या आव्हानात्मक आणि खडतर अशा भागात काम करणार असल्याने त्यांना अंगरक्षेची आवश्यक हेल्मेट, हातमोजे, गमबूट, जॅकेट आणि जॅकेट पाठीला दोर अशी सुरक्षा साधने कामगार ठेकेदार आणि संबंधितांनी देणे आवश्यक होते.
पण, ही साधने न देताच नीरजकुमार या इमारतीमधील सुतारकीची कामे करत होता. ही कामे करत असताना नीरजकुमारचा अचानक तोल गेला आणि ते इमारतीच्या बाहेरील भागात जमिनीवर पडले. वरून वेगाने जमिनीवर पडल्याने नीरजकुमार यांच्या हात, तोंड आणि पायाला गंभीर दुखापती झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण या सर्व गोष्टींना या इमारतीचे विकासक, कामगार ठेकेदार आणि पर्यवेक्षक जबाबदार असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक ए. व्ही. कदम याप्रकरणाचा तपास करत आहेत.