ठाणे : गुरूवारी दुपारच्या सुमारास शहाड आंबिवली स्थानका दरम्यान मालगाडीची जोडणी निघाली. या बिघाडामुळे कसारामार्गावरील लोकल सेवा काही वेळासाठी ठप्प झाली होती. अर्धातासाहून अधिक काळ ही मालगाडी बंद असल्याने लोकल गाड्या उशिराने धावत होत्या.
मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत- कसारा हे मार्ग महत्त्वाचे मानले जातात. या भागात मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झाले आहे. कसारा या मार्गिकेवरून नाशिकच्या दिशेने लांब पल्ल्याच्या गाड्या वाहतुक करत असतात. नाशिक भागातून मुंबई, ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देखील हा मार्ग महत्त्वाचा आहे. तसेच या भागातील पाडे, गावातून नोकरदार मुंबईत कामानिमित्ताने येतात. कसारा भागातून दिवासाला हजारो नोकरदार मुंबई, ठाण्याच्या दिशेने वाहतुक करतात.
कसारा भागातील प्रवाशांना उपनगरीय रेल्वेगाड्या पुरेशा प्रमाणात नाहीत. त्यामुळे या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची नेहमी गर्दी असते. रात्री आणि सकाळी कामाच्या वेळांमध्ये या गाड्यांमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी असते. कसारा रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण मागील काही वर्षांपासून वाढले आहे. अशातच गुरूवारी दुपारी १२.५० वाजताच्या सुमारास शहाड आंबिवली स्थानका दरम्यान मालगाडीच्या डब्यांची जोडणी निघाली.
या बिघाडामुळे ती मालगाडी बंद झाली. निघालेली जोडणी पुन्हा पुर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेचे कर्मचारी काम करत होते. जोडणी करण्याचे काम अर्धातासाहून अधिक काळ सुरू होते. या मालगाडीतील बिघाड अर्धातासानंतर ठिक करण्यात आला. त्यानंतर या मार्गावरील लोकलसेवा पुर्ववत सुरू करण्यात आली. मात्र अचानक झालेल्या या बिघाडामुळे प्रवाशांनी त्रास सहन करावा लागला.
दोन दिवसांपुर्वी लोकलवर दरड कोसळली
मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मुंबईहून कसारा रेल्वे स्थानकाच्या दिशेने उपनगरीय रेल्वेगाडी जात होती. ही रेल्वेगाडी कसारा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चारवर प्रवेश करत असतानाच रेल्वेगाडीच्या मागील तिसऱ्या डब्यावर अचानक एक दरड कोसळली. ही दरड रेल्वेगाडीच्या दारात उभ्या असणाऱ्या प्रवाशाच्या पायावर कोसळली. त्यामुळे त्याच्या पायाला मार लागून त्यात प्रवाशाला गंभीर दुखापत झाली होती. फलाटावर रेल्वेगाडी थांबल्यानंतर प्रवाशाला प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
कसारा भागात मागील काही वर्षांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे या भागात लोकल गाड्यांना कायम गर्दी असते. तसेच अनेकदा या मार्गावरील लोकल गाड्या उशिराने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या दररोजच्या समस्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी प्रवासी आणि प्रवाशी संघटनांकडून केली जात आहे.